बारामती: बारामती तालुका पोलिसांनी कारवाई करत तब्बल ५० लाखांच्या मेफेड्रोन अमलीपदार्थ तस्कर प्रकरणातील फरार आरोपीला गजाआड केले आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील तुळींज पोलीस ठाणे येथे १४ सप्टेंबर २०२५ रोजी गुन्हा नोंदवण्यात आला होता.

या गुन्ह्यातील समीर उर्फ नूर मोहम्मद अस्लम शेख (वय २०, रा. वसई) हा फरार होता. तो बारामती परिसरात असल्याची माहिती वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील पोलिसांनी बारामती तालुका पोलिसांना दिली होती. पथकाने शोधमोहीम राबवत तो बारामती शहरात वास्तव्यास असून एका कपड्याच्या दुकानात काम करतो अशी माहिती मिळाली. यानंतर पथकाने पाहणी करत आरोपीची ओळख पटवली आणि त्याला ताब्यात घेतले.

बारामती पोलीस ठाण्यात चौकशीदरम्यान त्याने तुळींज पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे कबूल केले. वसई विरार आयुक्तालयास माहिती देऊन आरोपीस त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार, सहाय्यक फौजदार सुरेंद्र वाघ, सुरेश बडे, आणि पोलीस अंमलदार निलेश वाकळे राहुल लांडगे यांच्या पथकाने केली.