बारामती : ‘माळेगाव सहकारी साखर कारखाना येथे कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प वर्षभरात पूर्ण करून दोन वर्षांत प्रकल्प कर्जमुक्त होऊन त्यातून प्रतिदिन १५ टन बायोगॅस निर्मिती केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी हा प्रकल्प वरदान ठरेल,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सांगितलेे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची ७० वी वार्षिक सर्वसाधारण सभा उपमुख्यमंत्री तथा कारखान्याचे चेअरमन अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शिवतीर्थ मंगल कार्यालयात झाली. त्या वेळी ते बोलत होते. सभेला उपाध्यक्ष संगीता कोकरे, कार्यकारी संचालक अशोक पाटील, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, चंद्रराव तावरे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘बायोगॅस प्रकल्पासाठी ७१ कोटी रुपये खर्च येणार असून, १८ कोटी स्वनिधी आणि उर्वरित ५४ कोटी रुपये कर्ज घेतले जाणार आहे. हा प्रकल्प वर्षभरात पूर्ण करून दोन वर्षांत प्रकल्प कर्जमुक्त होईल. या प्रकल्पातून प्रति दिन १५ टन बायोगॅस निर्मिती होणार आहे.’
‘या परिसरातील पालापाचोळा, शेण, घनकचरा आणि सांडपाणी यांचा वापर या प्रकल्पासाठी केला जाणार आहे. त्यामुळे नीरा नदीचे प्रदूषणही कमी होईल. तसेच, शेतकरी सभासदांच्या आर्थिक प्रगतीसाठी हा प्रकल्प उपयोगी ठरेल,’ असेही ते म्हणाले. नीरा डावा कालवा अस्तरीकरणास शेतकऱ्यांकडून विरोध करण्यात येत आहे. याबाबत पवार म्हणाले, ‘कालवा फुटण्याची शक्यता असलेल्या ठिकाणीच अस्तरीकरण करण्यात येईल.’