लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी ठरावीक वेळेत शहरात जड अवजड वाहनांना बंदी करण्यात आली असताना आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कारवाईचा दंडुका उगारला आहे. १६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत सहा हजार १७८ जड अवजड वाहनांवर कारवाई करत ६१ लाख ७१ हजारांचा दंड वसूल केला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चाकण, भोसरी, तळेगाव ही औद्योगिक क्षेत्रे, हिंजवडी, तळवडे, चिखली ही माहिती व तंत्रज्ञाननगरी (आयटी पार्क), तर देहू आणि आळंदी ही तीर्थक्षेत्रे आहेत. शहरातील सर्वांत मोठी बाजारपेठ पिंपरी येथे आहे. त्यामुळे या भागात मालाची ने-आण करणाऱ्या जड-अवजड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या वाहनांमुळे दिवसेंदिवस वाहतूककोंडीत भर पडत आहे. तसेच अपघातांचीदेखील संख्या वाढत आहे.

आणखी वाचा-पिंपरी : युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी गौरव चौधरी यांची निवड

यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने सकाळी आठ ते अकरा आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ या कालावधीत जड-अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंदी केली आहे. अशी वाहने शहरात दिसताच त्यांवर कारवाई केली जात आहे. दुचाकीवरून तिघांनी प्रवास करणे, खासगी वाहतूक करणाऱ्या बस, रिक्षा, विनावाहनतळ, मोठ्या आवाजाचे सायलेन्सर, विरुद्ध दिशेने वाहने चालवणारे आता वाहतूक पोलिसांच्या रडारवर आहेत. यापुढील काळात अशा वाहनचालकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर न्यायालयात खटला, तसेच गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. सर्वांनी नियमांचे पालन केले, तर संभाव्य अपघातांचा धोकादेखील अनेक पटींनी कमी होतो. स्वत:च्या आणि इतरांच्या जिवाची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी सांगितले.