पुणे : लोहगाव परिसरातील मराठा दरबार हॉटेलमध्ये शीतपेय आणि पाण्याची बाटली घेतल्यानंतर त्याचे पैसे मागितले म्हणून चौघांच्या टोळक्याने हॉटेलच्या व्यवस्थापकालाच बेदम मारहाण केली. यात व्यवस्थापक जखमी झाला आहे. पोलिसांनी चार अज्ञात आरोपींवर गुरुवारी गुन्हा दाखल केला.

याबाबत हॉटेल मराठा दरबारचे व्यवस्थापक संतोष राघेन्द्र शेट्टी (वय ४२, रा. वाघोली, पुणे) यांनी तक्रार दाखल दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेट्टी हे हॉटेल व्यवस्थापक म्हणून उपस्थित असताना चार अनोळखी ग्राहक हॉटेलमध्ये आले. त्यांनी शीतपेय आणि पाण्याची बाटली घेतली. मात्र, त्याचे पैसे देण्याची मागणी केली असता आरोपींनी शिवीगाळ सुरू केली. काही वेळानंतर आरोपींनी एकदमच शेट्टी यांना मारहाण सुरू केली. त्यातील काहींनी शेट्टी यांनी हॉटेलजवळ पडलेल्या दगडांनीही मारहाण केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मारहाणीत शेट्टी गंभीर जखमी झाले. आरोपी निघून गेल्यानंतर हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी शेट्टी यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचार घेऊन परतल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली असून, त्यानंतर अज्ञात चार आरोपींचा शोध घेतला जात आहे. विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सचिन जाधव याबाबत पुढील तपास करीत आहेत.