आघाडीतील नेत्यांची अनेक प्रकरणांची चौकशी सुरू असल्याने ते भाजपात जात आहेत. ईडीचा दबावाखाली ते भाजपात जात नसून ब्लॅकमेलिंग होत असल्याने ते भाजपात जात आहेत. त्याच बरोबर तिहार किंवा आर्थर रोड तुरूंगामध्ये जाण्यापेक्षा आघाडीचे नेते भाजपाचा तुरूंग स्वीकारत आहेत, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पक्षांतर करणार्‍या नेत्यांवर सडकून टीका केली. आघाडीतील नेत्यांना ईडीचा दबाव टाकून भाजपा पक्षात घेत आहे का? असा प्रश्न त्यांना पुणे येथील आयोजित पत्रकार परिषदेत विचारण्यात आला होता, यावर त्यांनी भूमिका मांडली.

यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आमच्या पक्षात येण्यासाठी देखील आघाडीतील अनेक नेते संपर्कात होते. मात्र, त्यांना आम्ही पक्षात घेतले नाही. माझ्याकडून अशा स्वरूपाचे फोडाफोडीचे राजकारण केव्हाच होणार नाही. सध्याचा कारभार हिटलर प्रमाणे चालवला जात आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपावर टीक केली.
तर, आगामी विधानसभा निवडणुकीत आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाणार, अशी चर्चा सुरू असल्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीदरम्यान आघाडीतील अनेक नेत्यांकडून वंचित आघाडीवर भाजपाची बी टीम म्हणून सतत टीका केली गेली. यावर आघाडीतील नेत्यांनी अगोदर स्पष्टीकरण द्यावे आणि त्यानंतर याबाबत ठरवले जाणार आहे. आता आम्ही विधानसभा निवडणुकीत २८८ जागांवर उमेदवार देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात येत आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी होत आहे. या भूमिकेतून आता बाण निघाला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील कोण नमते घेते, हे पाहणे गरजेचे ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.