पुणे : बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘बीड वाचतंय’ अभियानासाठी पुण्यात पुस्तक संकलन उपक्रम रविवारी राबविण्यात आला. पु. ल. देशपांडे उद्यान येथे झालेल्या उपक्रमात दोन हजारहून अधिक पुस्तकांचे संकलन करण्यात आले.विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती, संवेदनशीलता आणि चांगल्या नागरिकत्वाचे संस्कार घडवून या युवा पिढीला सकारात्मक जीवनमूल्यांकडे वळविण्यासाठी सरहद पुणे, अर्हम फाउंडेशन आणि समिधा इंडिया फाउंडेशन या संस्थांकडून ‘बीड वाचतंय’ अभियान राबविण्यात येत आहे. त्यालाच अनुसरून पुण्यामधील नागरिकांना पुस्तके देण्यासाठी आवाहन करण्यात आले होते.

पु. ल. देशपांडे उद्यान येथे रविवारी सुटीचा दिवस निवडून करण्यात आलेल्या पुस्तक संकलन उपक्रमाला पुणेकरांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. ऐतिहासिक कादंबऱ्या, आत्मचरित्रे, स्पर्धा परीक्षांसाठीची पुस्तके अशी विविध विषयांवरील दोन हजारांहून अधिक वाचनीय पुस्तके लोकांकडून जमा करण्यात आली. नागरिकांकडून ‘बीड वाचतंय’साठी शुभेच्छा देऊन असे पुस्तक संकलन उपक्रम पुण्यातील विविध भागांत घेण्यासाठी सूचनाही मिळाल्या.

पुस्तके देणाऱ्या नागरिकांचे अर्हम फाउंडेशनचे संस्थापक डॉ. शैलेश पगारिया, युवा उद्योजक-लेखक शरद तांदळे यांनी आभार मानले. प्रत्येक रविवारी पुण्यातील विविध भागांमध्ये पुस्तक संकलन सुरू ठेवण्यात येणार आहे. आपल्याकडील नवीन, जुनी वाचनीय पुस्तके ‘बीड वाचतंय’ अभियानासाठी द्यायची असल्यास ८६६८६०७३०० या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन संयोजन समितीकडून करण्यात आले आहे.