पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात उद्घाटन केलेल्या ‘ज्ञान-भारतम्’ मिशनशी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचा सामंजस्य करार नुकताच झाला असून पाच वर्षांच्या या कराराद्वारे भांडारकर संस्थेला ‘क्लस्टर सेंटर’चा दर्जा बहाल करण्यात आला आहे. या करारान्वये संस्थेच्या स्वतःच्या संग्रहाबरोबरच इतर संस्था आणि व्यक्तींच्या संग्रहांमधील हस्तलिखितांची नोंदणी, जतन, डिजिटायझेशन, भाषांतर, प्रकाशन आणि हस्तलिखितांवरील संशोधन अशा विविध गोष्टींची जबाबदारी भांडारकर संस्थेवर सोपविण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या संस्कृति-मंत्रालयाच्या वतीने नवी दिल्ली येथे केंद्रीय सांस्कृतिकमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या उपस्थितीत झालेल्या एका विशेष कार्यक्रमामध्ये या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. मंत्रालयाच्या वतीने सहसचिव समर नंदा आणि भांडारकर संस्थेच्या वतीने नियामक परिषदेचे सदस्य मनोज एरंडे यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. संस्थेचे निबंधक डॉ. श्रीनंद बापट या वेळी उपस्थित होते. अशा प्रकारचा क्लस्टर सेंटरचा दर्जा भांडारकर संस्थेसह देशातील बारा संस्थांना देण्यात आला आहे.
देशातील एक कोटी हस्तलिखितांचे डिजिटायझेशन आणि ती हस्तलिखिते लोकांना अभ्यासाकरिता उपलब्ध करून देणे हे या योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट असल्याचे गजेंद्रसिंह शेखावत यांनी या प्रसंगी सांगितले. चालू आर्थिक वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये घोषित करण्यात आलेल्या या योजनेची कार्यवाही आता होत असून तपशीलवार कार्ययोजनेसह तिचे काम लवकरच सुरू होईल असे संस्कृति-विभागाचे सचिव विवेक आगरवाल यांनी या प्रसंगी सांगितले.
भांडारकर संस्थेचे महत्त्व
ज्येष्ठ प्राच्यविद्या संशोधक रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याला अभिवादन म्हणून त्यांचे सहकारी आणि विद्यार्थ्यांनी ६ जुलै १९१७ रोजी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची स्थापना केली. तब्बल ४८ वर्षांच्या संशोधन आणि परिश्रमातून साकारलेल्या ‘महाभारताच्या चिकित्सक आवृत्ती’चे प्रकाशन १९६६ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले होते. महामहोपाध्याय डाॅ. पां. वा. काणे यांनी तीन तपांच्या संशोधनानंतर ‘धर्मशास्त्राचा इतिहास’ हा ग्रंथ सिद्ध केला होता. या ग्रंथासाठी त्यांना १९६४ मध्ये ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी किताबाने सन्मानित करण्यात आले होते.
अर्धशतकाहून अधिककाळ संस्थेच्या सचिवपदाची धुरा समर्थपणे पेलणारे डाॅ. रा. ना. दांडेकर यांचा ‘वेदिक बिब्लिओग्राफी हा ग्रंथ जगभरातील वेदाभ्यासकांसाठी संदर्भसूची ठरला. संस्थेच्या संग्रहातील ३५ हजारांहून अधिक हस्तलिखिते आणि सव्वा लाखांहून अधिक पुस्तके अभ्यासकांसाठी पर्वणी ठरली आहेत. संस्थेच्या संग्रहातील ऋग्वेदाची हस्तलिखित पोथी, ‘सहृदयालोकलोचन’ हा अभिनव गुप्ता यांचा काव्यशास्त्रावरील ग्रंथ, ‘पंचतंत्र’, भरतमुनींच्या ‘नाट्यशास्त्र ग्रंथाचे हस्तलिखित आणि भगवद्गीतेची काश्मिरी शारदा लिपीतील पाच हस्तलिखिते अशा पाच महत्त्वाच्या दस्तावेजांचा ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा नोंदीमध्ये समावेश झाला आहे.
