इतिहास संशोधन क्षेत्रातील मानदंड असलेल्या भारत इतिहास संशोधक मंडळाची वास्तू आणि इतिहासाचार्य वि. का. राजवाडे सभागृहाचा लवकरच कायापालट होणार आहे. आधुनिकतेने सजणाऱ्या या वास्तूच्या नूतनीकरण प्रकल्पाचे शनिवारी (३१ डिसेंबर) भूमिपूजन होणार आहे.
नूतनीकरण प्रकल्पासाठी अडीच कोटी रुपयांचे अर्थसाह्य करणाऱ्या मायदेश फाउंडेशनचे अरुण जोशी यांच्या हस्ते शनिवारी या प्रकल्पाचा शुभारंभ होत आहे. मंडळाच्या वास्तूमध्ये सायंकाळी साडेचार वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे भूषविणार आहेत.
हेही वाचा >>> पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एकाच बैठकीत ६२४ कोटींचे प्रस्ताव मंजूर
मंडळाचे चिटणीस पांडुरंग बलकवडे म्हणाले, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी ७ जुलै १९१० रोजी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली. संस्थेच्या वास्तूला शंभर वर्षांचा कालावधी लोटला असून कालानुरूप त्याच्या नूतनीकरणाची आवश्यकता आहे. ही वारसा वास्तू असल्याने मूळ स्थापत्य कायम ठेवून तिला आधुनिकतेचा साज देण्यात येणार आहे. आधुनिक आसनव्यवस्था, ध्वनियंत्रणा त्याचप्रमाणे संशोधकांची चित्रे या नव्या सभागृहात असतील. सभागृहाच्या उजव्या बाजूला मंडळाचे कार्यालय तर डाव्या बाजूला दोन छोटेखानी सभागृह असतील. यामध्ये मोडी, पर्शियन, फारसी आणि पाली अभ्यास वर्ग तसेच प्राच्यविद्या अभ्यासक्रम घेण्यात येणार आहेत. नूतनीकरण प्रकल्प एक वर्षाच्या आत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
भारत इतिहास संशोधक मंडळाचे वैभव
– २५ लाख मोडी कागदपत्रे
– ३० हजार हस्तलिखिते
– दीड हजार ऐतिहासिक लघुचित्रे (मिनीएचर पेंटिंग्ज)
– ताम्रपट, नाणी, शस्त्रे, शिलालेख, ताडपत्रे
– इतिहास विषयावरील ५० हजारांहून अधिक ग्रंथ
– इतिहासाचार्य वि. का. राजवाडे लिखित ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’च्या २१ खंडांचे प्रकाशन
– राजवाडे यांचे लेखसंग्रह – शहर इतिहासाविषयी ग्रंथ