गोखले इन्स्टिट्यूटमधील एक कोटी ४२ लाखांचा निधी नियमबाह्य पद्धतीने वळविल्याची तक्रार

पुणे : गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेतील एक कोटी ४२ लाख रुपयांचा निधी नियमबाह्य पद्धतीने वळविल्याचा आरोपावरून ‘सर्व्हंट्स सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी’चे सचिव मिलिंद देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी मिलिंद देशमुख यांना अटक करण्यात आली असून, त्यांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर यांनी दिली.

याबाबत डाॅ. विशाल भीमराव गायकवाड (वय ३९, रा. रामनगर, वारजे) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डाॅ. गायकवाड हे २०२२ पासून गोखले संस्थेत संशोधन समन्वयक (रिसर्च को ऑर्डिनेटर) म्हणून काम पाहत होते. सध्या ते संस्थेत ‘ऑफिशिएटिंग डेप्युटी रजिस्ट्रार’ आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी’ अर्थात भारत सेवक समाज ही गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेची मातृसंस्था आहे. शासकीय अनुदान, विद्यार्थ्यांचे शुल्क तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निधीवर संस्थेचे कामकाज चालते. विद्यापीठ अनुदान आयाेगाच्या नियमावलीनुसार शैक्षणिक संस्थेतील निधी अन्य खात्यांत वळवणे नियमबाह्य आहे.

मिलिंद देशमुख यांनी १३ डिसेंबर २०२२ रोजी संस्थेला पत्र दिले. नागपूर येथील सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीची जमीन ‘फ्री होल्ड’ करण्यासाठी दीड काेटी रुपयांची मागणी केली. संबंधित मागणी संस्थेतील कोणत्याही सदस्यांची परवानगी न घेता, तसेच ठराव न करता करण्यात आल्याचे डाॅ. विशाल गायकवाड यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीच्या पत्रावर गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचा शिक्का आहे. गोखले संस्थेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत रकमेच्या मागणीला २४ फेब्रुवारी २०२३ रोजी तत्त्वत: मंजुरी देण्यात आली. यापैकी एक कोटी दोन लाख रुपये नागपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यावर, तसेच ४० लाख रुपये धनादेशाद्वारे सोसायटीच्या खात्यावर पाठवण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या रकमेचा वापर जुनी कागदपत्रे मिळवणे, मुद्रांक शुल्क, सल्लागार शुल्क, प्रशासकीय खर्च या कारणांसाठी दाखवण्यात आला. या खर्चाचा तपशील संशयास्पद आहे. मिलिंद देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संस्थेची फसवणूक करून स्वतःच्या फायद्यासाठी निधीचा अपहार केल्याचा आरोप डाॅ. गायकवाड यांनी फिर्यादीत केला आहे. डाॅ. गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.