भांडारकर संस्थेच्या प्राच्यविद्या अभ्यासाला आधुनिक माध्यमाचा साज

पुणे : प्राच्यविद्या क्षेत्रातील अभ्यास आणि संशोधनाला जागतिक स्तरावर नेण्याच्या उद्देशातून भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतर्फे निर्मिती करण्यात आलेल्या ‘भारत विद्या’ या ऑनलाइन शैक्षणिक व्यासपीठाचे (डिजिटल प्लॅटफाॅर्म) बुधवारी (२१ सप्टेंबर) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. जगभरातील अभ्यासक आणि संशोधकांना दक्षिण आशियाई तत्त्वज्ञानासह पारंपरिक ज्ञानसाठा खुला करत भांडारकर संस्थेने प्राच्यविद्या अभ्यासाला आधुनिक माध्यमाचा साज दिला आहे. संस्थेच्या नवलमल फिरादिया सभागृहात सायंकाळी साडेचार वाजता होणाऱ्या कार्यक्रमास उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. सी-डॅक आणि ज्ञानसा या संस्थांच्या सहकार्याने निर्मिती होत असलेले हे ऑनलाइन शैक्षणिक व्यासपीठ सी-डॅकच्या ‘क्लाउड’द्वारे उपलब्ध होत आहे.

हेही वाचा >>> Maharashtra Breaking News Live : दसरा मेळाव्यावरून शिंदे-ठाकरे गट आमने-सामने; राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…

स्थापनेची शताब्दी पार केलेल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने कात टाकत आधुनिकतेची कास धरली आहे. पारंपरिक ज्ञानसाठा जगभरातील अभ्यासक आणि संशोधकांना खुले करण्यासाठी शैक्षणिक व्यासपीठ विकसित करण्यात आले आहे. त्यावर विनाशुल्क व्याख्याने, संस्थेचे विविध अभ्यासक्रम, अन्य विद्यापीठांचे अभ्यासक्रम, ग्रंथालय, प्रश्नोत्तरांचा स्वतंत्र विभाग असा ‘फोरसेरा’च्या धर्तीवर व्यासपीठ विकसित केले आहे, अशी माहिती भांडारकर संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी दिली. सातत्याने नवीन ज्ञानाची भर पडत राहणार असल्याने शैक्षणिक व्यासपीठ हे निरंतर सुरू राहणारे काम आहे, याकडे पटवर्धन यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा >>> लम्पीच्या लसीकरणासाठी खासगी पशुसंवर्धन पदवीधारकांची मदत

असे आहे शैक्षणिक व्यासपीठ

– प्राच्यविद्येसह विविध विषयांमध्ये ज्ञान संपादन करू इच्छिणारे विद्यार्थी, अभ्यासक आणि संशोधकांना उपयुक्त ठरेल.

– व्यासपीठावर ठेवण्यात येणाऱ्या आशयसंपन्न ज्ञाननिर्मितीसाठी विद्वान अभ्यासकांना योग्य ते मानधन

– यापैकी काही अभ्यासक्रम सशुल्क असतील ज्याद्वारे संस्थेला उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होईल.

– या अभ्यासक्रमाद्वारे मिळणारे पैसे हे पुन्हा आशयसंपन्न ज्ञाननिर्मितासाठी गुंतवणूक म्हणून उपयोगात आणले जाणार आहेत.

– ज्ञानातून संपत्ती आणि ज्ञाननिर्मितीसाठी संपत्तीचा विनियोग याद्वारे डिजिटल अर्थसंरचना निर्माण होईल.

– दक्षिण आशियाई तत्त्वज्ञानाचे व्यासपीठ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रामायण, महाभारत, बौद्ध आणि जैन तत्त्वज्ञानाची निर्मिती आणि विकसित झालेल्या पारंपरिक ज्ञानासह हे व्यासपीठ दक्षिण आशियाई तत्त्वज्ञानाचे समग्र व्यासपीठ म्हणून कार्यरत राहील. केवळ प्राच्यविद्याच नाही, तर गायन, चित्र-शिल्प, नृत्य, नाटय़शास्त्र, विज्ञान, मानसशास्त्र, भूगोल असे विविध विषय त्या व्यासपीठावर एकावेळी असतील. पहिल्या वर्षी चारशे तास कालावधीचे ज्ञान त्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध (अपलोड) करून देण्यात येणार आहे.

– भूपाल पटवर्धन, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था