लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : शरद पवार यांचे कट्टर विरोधक अशी ओळख असलेले माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव, भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या लोकसभा निवडणुकीबाबतच्या राजकीय भूमिकेबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली असताना आमदार थोपटे, बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमवेत महाविकास आघाडीच्या रविवारी झालेल्या मेळाव्याला उपस्थित राहिले. महाविकास आघाडीबरोबरच असून कायम राहणार असल्याचे थोपटे यांनी स्पष्ट केले.
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा अशी लढत रंगणार आहेत. या निमित्ताने वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. सुनेत्रा पवार यांनी शरद पवार विरोधक अशी ओळख असलेल्या माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची शनिवारी भेट घेतली होती. तसेच थोपटे यांचे चिरंजीव, आमदार संग्राम हे भाजपमध्ये दाखल होणार असल्याची चर्चाही काही दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रामवस्था निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भोरमध्ये रविवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमवेत संग्राम थोपटे उपस्थित राहिले.
आणखी वाचा-कसब्यातील विजयाची वर्षपूर्ती आमदार रवींद्र धंगेकर यांनी कशी साजरी केला?
थोपटे गेली काही वर्षे भोरचे आमदार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येत असलेल्या भोर विधानसभा मतदारसंघातील मतदान सुप्रिया सुळे यांच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. भोर विधानसभेतून त्यांना अपेक्षित मतदान झालेले नाही. त्यातच संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सातत्याने होत आहे. त्यामुळे संग्राम थोपटे यांच्या राजकीय भूमिकेकडेही लक्ष लागले होते. मात्र मेळाव्याला उपस्थित राहून महाविकास आघाडीबरोबर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा सातत्याने होत आहे. जिल्ह्यातून आणि जिल्ह्याबाहेहूनही तशी विचारणा करणारे दूरध्वनी सातत्याने येत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी माझ्या कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यावेळीही माझी राजकीय भूमिका काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. मात्र मी महाविकास आघाडीबरोबरच आहे आणि यापुढेही राहीन. यापूर्वीच्या काही निवडणुका काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित लढल्या होत्या. त्यावेळी आघाडीचा धर्म पाळून मी आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी ताकद दिली होती. आगामी लोकसभा निवडणुकीतही ताकद दिली जाईल. त्यानुसार येत्या शनिवारी (९ मार्च) शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आणखी वाचा-मुंबईत का जाणवतोय गारवा ? पुढील दोन दिवस …
निवडणूक आल्यावर काही पक्ष मोठे मेळावे घेतात. यातून कोणाची जाहिरात होते, हे पाहिले पाहिजे. महायुतीमध्ये जाहिरात करण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर होत आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती येथे झालेल्या ‘नमो महारोजगार मेळाव्यावर’ टीका केली. खासदार पारदर्शी असला पाहिजे. त्यामुळे मी कुठे आहे, कोणत्या गावात भाषण करत आहे, हे समाजमाध्यमातून लोकांना समजते. त्यामुळे त्याची माहिती देणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे, अशा शब्दात त्यांनी त्यांच्या ‘सेल्फी’ वरून अजित पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले.