दोन वर्षांत एक हजार कोटी खर्च; उत्पन्नात घसरण

पिंपरी: पिंपरी पालिकेच्या उत्पन्नाला गेल्या दोन वर्षांत तब्बल एक हजार कोटींचा फटका बसला आहे. करोनाचा प्रादुर्भाव हे त्यामागचे मुख्य कारण असले तरी, इतरही घटक या आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरले आहेत. पालिकेच्या उत्पन्नाचे मार्ग कमी झाले असून खर्चाचे आकडे वाढताना दिसत आहेत.

मार्च २०२० पासून करोनाचे संकट उद्भवले, त्याचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला. पिंपरी पालिकाही त्याला अपवाद राहिली नाही. उद्योगनगरीचे संपूर्ण अर्थकारण करोनामुळे कोलमडून पडले. महापालिकेची शहरभरात सुरू असलेली विकासकामे ठप्प झाली. मिळकतकर, बांधकाम परवानगी, जाहिरात परवाना, स्थानिक संस्था कर, मुद्रांक शुल्क, पाणीपट्टी  अशा विविध माध्यमातून पालिकेला भरघोस उत्पन्न मिळते. तथापि, या हक्काच्या उत्पन्नाला घसरण लागली. त्याचा थेट परिणाम शहरातील विकासकामांवर झाला. अनेक कामांना निधी उपलब्ध करून देता आला नाही. दोन वर्षांच्या कालखंडानंतर आता हळूहळू परिस्थिती नियंत्रणात आली आहे. मात्र, उत्पन्नाचा फटका बसल्याचे पडसाद अंदाजपत्रकात स्पष्टपणे दिसून येत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पार्श्वभूमीवर, आयुक्त राजेश पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना पालिकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. आयुक्त म्हणाले,की करोनामुळे सर्वाना फटका बसला, तसाच तो पिंपरी-चिंचवड शहरालाही बसला.  शहरवासियांचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडून पडले. महापालिकेच्या प्रमुख उत्पन्नाचे स्त्रोत असणाऱ्या विभागांकडून मिळणारे उत्पन्न मंदावले. येणारे उत्पन्न व होणाऱ्या खर्चाचा ताळमेळ बसत नव्हता. उत्पन्न कमी  होत चालले असून त्या तुलनेत खर्च कमी झालेले नाहीत. उत्पन्न आणि खर्चातील ही दरी कमी करण्याचा पालिका प्रशासनाचा यापुढे प्रयत्न राहणार आहे. मावळत्या वर्षांत भांडवली व करोनाविषयक कामांसाठीचा खर्च प्राधान्याने करण्यात आला. आगामी वर्षांतही तेच धोरण राहणार आहे. नवे प्रकल्प राबवण्यात येणार नाहीत. जुन्या आणि पूर्णत्वाच्या मार्गावर असलेल्या कामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. उत्पन्नवाढीसाठी सर्व पर्यायांचा विचार केला जात आहे.