पुणे : विधानसभा निवडणुकीत भाजपला, तर महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील मतदार यश मिळवून देत आले आहेत. ही सल कायमची काढून टाकण्यासाठी प्रारूप प्रभागरचना करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाबरोबरच महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्राबल्य असलेल्या भागाला भाजपबहुल परिसराची जोड देऊन काँग्रेस आणि दोन्ही ‘राष्ट्रवादी’च्या पारंपरिक मतदारांची विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे या पक्षांच्या उरल्यासुरल्या आशेवरही पाणी फेरले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ हा मागील सलग तीन विधानसभा निवडणुकांत भाजपला यश देत आला आहे. त्यापूर्वी हा मतदारसंघ काँग्रेसच्या पाठिशी राहिला होता. मात्र, महापालिका निवडणुकीत या भागातील मतदार काँग्रेस आणि तत्कालीन ‘राष्ट्रवादी’लाही साथ देत आला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला कोंडीत पकडण्यासाठी प्रभागरचना करताना या दोन्ही पक्षांंचे प्राबल्य असलेल्या परिसराचे विभाजन करून त्याला भाजपबहुल परिसराची जोड देण्यात आली आहे.

कोरेगाव पार्क-मुंढवा हा नवीन प्रभाग तयार करण्यात आला आहे. यापूर्वी मुंढव्याला मगरपट्टा हा भाग जोडण्यात आला होता. त्यामुळे या प्रभागातून तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही नगरसेवक निवडून आले होते. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे विद्यमान आमदार चेतन तुपे, दिवंगत माजी महापौर चंचला कोद्रे, माजी उपमहापौर बंडू गायकवाड आणि हेमलता मगर हे होते. मात्र, आता मुंढवा भागाला कोरेगाव पार्क हा भाजपचा हक्काचा भाग जोडण्यात आला आहे.

कोरेगाव पार्कमध्ये मागील वेळी चारही नगरसेवक भाजपचे होते. त्यामध्ये भाजपच्या चिन्हावर भारतीय रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत उपमहापौर नवनाथ कांबळे हे निवडून आले होते. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांची कन्या हिमाली कांबळे या निवडून आल्या. नवीन प्रभागरचनेमुळे या प्रभागात आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षापुढे आव्हान उभे राहिले आहे.

वानवडी या पूर्वीच्या प्रभागाला आता साळुंखे विहार हा भाजपचा मतदार असलेला भाग जोडण्यात आला आहे. मागील निवडणुकीत वानवडी भागात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि त्यांच्या मातु:श्री रत्नप्रभा जगताप हे निवडून आले हाेते, तर अन्य दोन जागांवर भाजपचे नगरसेवक होते. आता प्रभागरचनेत साळुंखे विहार या परिसरामुळे भाजपला झुकते माप मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पूर्वी कोंढवा खुर्द – मिठानगर असा प्रभाग होता. या प्रभागातून तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर हे निवडून आले होते. तसेच कौसरबाग-महंमदवाडी हा प्रभाग होता. या प्रभागातून तत्कालीन शिवसेनेचे प्रमोद भानगिरे, प्राची आल्हाट आणि तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नंदा लोणकर या निवडून आल्या होत्या. एक जागा भाजपला मिळाली होती. आता नवीन रचनेत कोंढवा खुर्द-कौसरबाग असा प्रभाग झाला आहे. महंमदवाडी आणि मिठानगर या दोन्ही ‘राष्ट्रवादी’ला साथ देणाऱ्या परिसराची विभागणी करण्यात आली आहे. येथील गठ्ठा मतदारांची विभागणी झाल्याने प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष आणि मनसेची अडचण झाली आहे.

मुकुंदनगर – सॅलसबरी पार्क या प्रभागात फारसा बदल करण्यात आलेला नाही. मागील निवडणुकीत चारही नगरसेवक भाजपचे होते. भाजपचे माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्यासाठी हा प्रभाग आणखी सोपा झाला आहे. पूर्वीचा डायस प्लॉट हा भाग या प्रभागातून तोडण्यात आला आहे.

लोहियानगर-काशेवाडी या पूर्वीच्या प्रभागातून माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांचे पुत्र अविनाश बागवे आणि रफिक शेख हे दोन काँग्रेसचे माजी नगरसेवक निवडून आले. अन्य दोन भाजपच्या नगरसेविका होत्या. मात्र, आता या भागाला डायस प्लॉट हा भाग जोडून काशेवाडी-डायस प्लॉट हा प्रभाग तयार करण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारांचा कस लागण्याची शक्यता आहे.

प्रभाग क्रमांक आणि प्रभागाचे नाव

  • १४ कोरेगाव पार्क – मुंढवा
  • १८ वानवडी – साळुंखे विहार
  • १९ कोंढवा खुर्द – कौसरबाग
  • २२ काशेवाडी – डायस प्लॉट