पुणे : ‘शहरातील मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी (एसटीपी) पुणेकरांकडून कराच्या माध्यमातून गोळा केलेल्या १८६० कोटी रुपयांची उधळपट्टी करण्याचा घाट राज्यात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाने घातला आहे. या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात अनियमितता असून, या प्रकल्पाची निविदा भाजपच्या एका पदाधिकाऱ्याशी संबंधित कंपनीला देण्यात आली आहे,’ असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने केला आणि याविरोधात महापालिका भवनासमोर आंदोलन केले.
शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार बापू पठारे, नीलेश निकम, नितीन कदम, पप्पू गोगले, किशोर कांबळे, आशा साने, आसिफ शेख, अमोघ ढमाले, गणेश नलावडे, रोहन पायगुडे, रूपाली शेलार, अजिंक्य पालकर, मंगेश मोरे आणि शैलेंद्र भेलेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.
‘महापालिका प्रशासनाने नव्याने मंजूर केलेल्या सहा एसटीपी प्रकल्पांच्या निविदा प्रक्रियेत बदल करून भाजपच्या संबंधित कंपनीला फायदा व्हावा, यासाठी प्रयत्न करण्यात आला,’ असा आरोप माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष जगताप यांनी आंदोलनादरम्यान केला. ‘निविदेतील अटींमध्ये फेरफार करून या कंपनीसाठी प्रक्रिया अनुकूल करण्यात आली,’ असा दावा यावेळी करण्यात आला. या निर्णयामुळे महापालिकेच्या निधीतून सुमारे ५०० कोटी रुपयांचा आर्थिक तोटा होणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.
‘महापालिकेकडे असलेल्या ठेवी आणि राज्य, केंद्र सरकारच्या अनुदानातून हा एसटीपी प्रकल्प उभारणे शक्य असताना ठेकेदारी पद्धतीने प्रकल्प देण्यामागे राजकीय हेतू असून, महापालिका प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा,’ अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.
नक्की कसा मंजूर झाला प्रस्ताव
हा प्रस्ताव मान्य होण्याच्या आदल्या दिवशी भाजपचे माजी सभागृह नेते तसेच भाजप चे शहरातील पदाधिकारी महापालिकेत बसून होते. हा प्रस्ताव मान्य करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून महापालिका आयुक्तांकडे आग्रह धरण्यात आला होता. यामध्ये महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार असल्याचे महापालिका प्रशासनाने भाजपच्या स्थानिक नेत्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणत्याही स्थितीत हा प्रस्ताव मान्य झालाच पाहिजे, अशी भूमिका घेण्यात आली. त्यानंतर रात्री उशीरा हालचाली होऊन हा प्रस्ताव अंतिम करण्यात आला.
नागपूर येथील भाजप पदाधिकाऱ्याच्या मर्जीतील कंपनीला हे सर्व काम मिळाले आहे. पुणे शहरात तयार होणाऱ्या मैलापाण्यावर चांगल्या पद्धतीने प्रक्रिया करुन हे पाणी पुन्हा नदीत सोडून त्याचा वापर करता यावा, यासाठी महापालिकेने सहा मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांचे नुतनीकरण केले जाणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर दररोज ४५१ एमएलडी मैलापाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. यामध्ये दोन मैलापाणी शुद्धीकरण केंद्र पूर्णपणे नव्याने बांधली जाणार असून चार केंद्रांमध्ये पाणी शुद्धीकरणासाठी अद्यावत यंत्रणा बसविली जाणार आहे.
