बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या खटल्यातून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची बारामतीचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. पी. पुजारी यांनी निर्दोष मुक्तता केली.

खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पडळकर हे मंगळवारी (दि. ३) बारामती न्यायालयात आले होते. २०२० मध्ये पडळकर यांनी ‘शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना’ असे वादग्रस्त विधान केले होते. याप्रकरणी राष्ट्रवादीचे तत्कालीन युवक शहराध्यक्ष अमर धुमाळ यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात पडळकर यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी पडळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. सहायक पोलीस निरीक्षक मुकुंद पालवे यांनी या प्रकरणाचा तपास करत पडळकर यांच्या विरोधात बारामती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

या गुन्ह्यात जामीन घेतल्यानंतर वारंवार समन्स बजावूनही पडळकर हे न्यायालयात हजर झाले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले होते. या खटल्यात चार साक्षीदार तपासण्यात आले. पोलिसांनी पडळकर यांच्या विरोधात ज्या कलमान्वये गुन्हा दाखल केला, ते त्यांच्यासाठी लागू होत नसल्याचा युक्तिवाद पडळकर यांच्या वकिलांनी केला. पडळकर यांच्या विधानाच्या अनुषंगाने कोणतीही दंगल भडकलेली नव्हती किंवा धर्म-जातींमध्ये अराजकता निर्माण झाली नाही. त्यांचे विधान व्यक्तिशः होते. समुदायाला अनुसरून नव्हते, असा युक्तिवाद करण्यात आला. न्यायालयाने तो ग्राह्य धरत पडळकर यांची निर्दोष मुक्तता केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.