पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी १२ कोटींचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. भाजपचे आमदार शंकर जगताप यांच्या प्रयत्नातून हा निधी मिळाला आहे. महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेंतर्गत चार कामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये रावेत येथे बहुउद्देशीय इमारत बांधणे, मामुर्डी येथील महापालिकेच्या जागेत क्रीडा संकुल उभारणे, वेणूनगर (वाकड) येथे क्रीडा संकुल उभारणे, किवळे येथील जागेत राष्ट्रीय दर्जाचे भारतरत्न उद्यान विस्तारीकरण करणे या मोठ्या कामांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सुविधा पुरविण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये वाकडमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक सभागृह बांधणे, क्रीडा संकुल उभारणे, जलतरण तलाव बांधणे, टेनिस कोर्ट तयार करणे, तसेच पुनावळ्यामध्ये सभागृह, वाचनालय, विरंगुळा केंद्र बांधणे आणि सांगवी परिसरात विविध सुशोभीकरणाच्या कामांचा समावेश आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत १४ कामांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्या अंतर्गत किवळे एमबी कॅम्प झोपडपट्टीत पाण्याची लाइन, सांडपाणी वाहिनी, वाचनालय उभारणे, काँक्रिटीकरण करणे, सभा मंडप बांधणे, तसेच नागसेननगर झोपडपट्टी येथे वाहतूक बेटाचे सुशोभीकरण करणे, नवीन स्वच्छतागृह उभारणे, पिंपळे गुरव लक्ष्मीनगर येथे बुद्धविहाराची सीमाभिंत व विहारात अभ्यासिका तयार करणे, वेताळनगर झोपडपट्टी बौद्धविहार परिसरात विविध कामे करणे, जगतापनगर (थेरगाव) येथील दलितवस्ती परिसरात आणि राजीव गांधीनगर (पिंपळे गुरव) झोपडपट्टीत सांडपाणीवाहिनी टाकणे या कामांचा समावेश आहे.
‘वाढत्या शहरीकरणामुळे नागरिकांच्या मूलभूत सोयी-सुविधांची गरज प्रचंड वाढली आहे. शासनाकडून मंजूर झालेला हा बारा कोटींचा निधी म्हणजे विकसित आणि स्मार्ट चिंचवड मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. विशेषतः वाकड, पुनावळे, रावेत, मामुर्डी आणि किवळे या झपाट्याने विकसित होत असलेल्या भागातील नागरिकांना या कामांचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ होईल. खेळाडू, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवकांसाठी निर्माण होणारी नवीन केंद्रे ही आरोग्यदायी, सशक्त आणि विकसित चिंचवडच्या’ निर्मितीकडे एक ठोस पाऊल आहे. शासन निधीचा योग्य वापर करून प्रत्येक नागरिकापर्यंत विकास पोहोचवणे, हेच आमचे ध्येय’ असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले.
