पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनावरून खासदार मेधा कुलकर्णी आणि भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पक्षशिस्तीवर ‘चिंतन’ करण्यात आले. पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी जाहीर वक्तव्य करू नये, अशा शब्दांत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. पुढील काळात पक्षातील गटबाजी बाहेर येऊ देऊ नका, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
भाजपची संघटनात्मक बैठक डी. पी. रस्त्यावरील घरकुल लॉन्स येथे घेण्यात आली. या बैठकीला मोहोळ, पाटील, खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह पक्षाचे आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत भाजपच्या महिला आघाडीने केलेल्या आंदोलनावरून झालेल्या वादावर चर्चा करण्यात आली. पाटील आणि मोहोळ यांच्याकडून आंदोलकांची पाठराखण करण्यात आली.
‘कोणतीही गंभीर घटना घडल्यानंतर त्यावर कार्यकर्त्यांकडून आंदोलन करणे, ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. मात्र, त्यावर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून जाहीर टीका करणे योग्य नाही. कार्यकर्त्यांचे काही चुकले असेल, तर त्यांना पक्षाच्या बैठकीत समजावून सांगणे गरजेचे आहे.’ अशा शब्दांत पाटील आणि मोहोळ यांनी पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्षाचा झेंडा महापालिकेवर फडकाविण्यासाठी कशा पद्धतीने काम केले पाहिजे. संघटनात्मक पातळीवर काम करताना पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी कोणती भूमिका घेतली पाहिजे, याबाबत या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. यापुढील काळात अशा पद्धतीने पक्षातील गटबाजी बाहेर येऊ देऊ नका, अशा सूचनाही देण्यात आल्या.
दरम्यान, आपणही एक कार्यालयाची तोडफोड केल्याची आठवण बैठकीत पक्षाच्या एका नेत्यांने सांगितली.
पक्षाची संघटनात्मक बैठक झाली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यात आला. काही बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नव्याने मंडल रचना, नियुक्त्या केल्या जाणार आहेत. – धीरज घाटे, शहराध्यक्ष, भाजप