विधानसभा निवडणुकीत पुणे शहरातील आठ मतदारसंघांपैकी तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे भाजपासाठी हा मोठा झटका मानला जात आहे. कारण २०१४ च्या निवडणुकीत पुणे शहरातील सर्वच्या सर्व आठही मतदारसंघात भाजपाचे उमेदवार निवडून आले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीसाठी देखील हा मोठा विजय मानला जात आहे.

हडपसर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या चेतन तुपे यांनी भाजपाचे योगेश टिळेकर यांचा २८९५ मतांनी पराभव केला आहे. तर खडकवासला मतदारसंघात सचिन दोडके हे राष्ट्रावादी काँग्रेसचे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत. त्याचबरोबर वडगावशेरी मतदारसंघातून सुनिल टिंगरे हे ११व्या फेरीनंतर ११,३९८ मतांनी आघाडीवर आहेत. तर पुणे कॅन्टोन्मेट मतदारसंघातून काँग्रेसचे रमेश बागवे हे आघाडीवर आहेत.

दरम्यान, कसबा मतदारसंघातून महापौर मुक्ता टिळक या विजयी झाल्या आहेत. त्याचबरोबर अतिशय चर्चेत राहिलेल्या कोथरुड मतदारसंघातून चंद्रकांत पाटील हे विजयी आघाडीवर आहेत. त्याचबरोर शिवाजीनगर मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे २७८१ मतांनी आघाडीवर आहेत. तर पर्वती मतदारसंघातून माधुरी मिसाळ आघाडीवर आहेत.