लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

पुणेः ब्लॅकस्टोन या जागतिक पातळीवरील गुंतवणूक कंपनीकडून पुणेस्थित कोलते-पाटील डेव्हलपर्समधील ६६ टक्के हिस्सा १,८०० कोटी रुपयांच्या मोबदल्यात ताब्यात घेतला जाणार आहे. भारतातील गृहनिर्माण क्षेत्रात विस्तारासाठी ब्लॅकस्टोनने हे पाऊल उचलले आहे.

कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेड (केडीपीएल) कंपनीच्या निवेदनानुसार, केपीडीएलमधील ६६ टक्के हिस्सा १,८०० कोटी रुपयांना ब्लॅकस्टोन ताब्यात घेणार आहे. केपीडीएलकडून ब्लॅकस्टोन रिअल इस्टेट फंड्सला १.२७ कोटी समभाग (सुमारे १४.३ टक्के) दिले जाणार आहेत. यातून कंपनी ४१७.०३ कोटी रुपये उभे करणार आहे. केपीडीएलच्या विद्यमान प्रवर्तकांकडून आणखी २५.७ टक्के भागभांडवली हिस्सा ब्लॅकस्टोन रिअल इस्टेंट फंड्स विकत घेईल. यातून एकत्रित ४० टक्के हिस्सा ब्लॅकस्टोनच्या ताब्यात येईल. उरलेला २६ टक्के हिस्सा ब्लॅकस्टोन ‘ओपन ऑफर’च्या माध्यमातून खुल्या बाजारातून सामान्य भागधारकांकडून खरेदी करणार आहे.

केपीडीएलने जागतिक पातळीवरील ब्लॅकस्टोन या गुंतवणूक कंपनीशी हा व्यूहात्मक भागीदारी करार केला आहे. केपीडीएलच्या इतिहासातील हा मैलाचा दगड ठरेल असा टप्पा असून, कंपनीकडून ब्लॅकस्टोनच्या वित्तीय क्षमतांचा वापर विस्तारासाठी केला जाईल. यातून भारतीय गृहनिर्माण क्षेत्रात कंपनी आपले अग्रस्थान कायम ठेवेल, असे केपीडीएलने निवेदनात म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्यनिर्मिती

ब्लॅकस्टोनशी भागीदारी हा ‘केडीपीएल’च्या प्रगतीतील महत्त्वाचा टप्पा आहे. यातून आमच्या भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण होईल. ब्लॅकस्टोनची गुंतवणूक ही आमच्या क्षमतांवर दाखविलेला सार्थ विश्वास आहे. असे कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेडचे अध्यक्ष 
राजेश पाटील म्हणाले. सोमवारी मुंबई शेअर बाजारात कंपनीच्या शेअरचा भाव दी़ड टक्का घसऱणीसह ३४२ रुपयांवर स्थिरावला. मात्र मार्चच्या सुरुवातीला असलेल्या २४३ रुपयांच्या पातळीपासून शेअरच्या भावाने अल्पावधीत चांगली वाढ दर्शविली आहे.