तरुणांमधील अंगभूत विचारक्षमतेची जोपासना होण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या ‘ब्लॉग बेंचर्स’ या उपक्रमाच्या माध्यमातून संधी मिळेल, असे मत व्यक्त करत पुण्यातील प्राचार्य आणि प्राध्यापकांनी या उपक्रमाचे स्वागत केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्ह्य़ातील प्राचार्य आणि प्राध्यापकांची बैठक बुधवारी स. प. महाविद्यालयात झाली. या वेळी ‘ब्लॉग बेंचर्स’बाबत माहिती देण्यासाठी सादरीकरण करण्यात आले. आपल्याला ‘लोकसत्ता’चा हा उपक्रम आवडला, विद्यार्थी मुळात हुशार असतातच, प्राचार्य आणि प्राध्यापकांचे त्यांना प्रोत्साहन मिळाल्यास ते लेखनात पुढे जातील, अशा शब्दांत डॉ. गाडे यांनी या वेळी ‘ब्लॉग बेंचर्स’चे कौतुक केले.
हा उपक्रम खास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यात ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या ठराविक अग्रलेखावरील दोन तज्ज्ञांची मते विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली जातील. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी ५०० ते ७०० शब्दांचे निबंधवजा टिपण लिहायचे आहे.
डॉ. गाडे म्हणाले, ‘अगदी सातवी- आठवीपासूनच विद्यार्थ्यांना नवनव्या कल्पना सुचत असतात. त्यांना लिहायला वाव मिळाल्यास चांगले लेखक निर्माण होऊ शकतील. पुण्याच्या ग्रामीण भागातील महाविद्यालयांना भेटी दिल्यावर त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी कल्पकता असल्याचे जाणवले. त्यांच्यात क्षमता आहेत परंतु शहरी मुलांकडे संज्ञापनाची साधने अधिक असल्याने आपण कमी पडू असा संकोचही आहे. या विद्यार्थ्यांसाठी ‘ब्लॉग बेंचर्स’ उत्कृष्ट व्यासपीठ आहे. तांत्रिक विषयांचे शिक्षण घेणारे विद्यार्थी लेखनात कमी पडतात असे म्हटले जाते, परंतु ठरावीकच विद्याशाखेत शिकणाऱ्यांकडे क्षमता असतात असे नाही. लेखनाबद्दल विद्यार्थ्यांना नाव मिळण्याचे आकर्षण असल्यामुळे अधिक विद्यार्थी ‘ब्लॅाग बेंचर्स’मध्ये सहभागी होतील.’’
या निमित्ताने विद्यार्थ्यांकडून अग्रलेख वाचले गेल्यास त्यांची वैचारिक उंची वाढेल. त्याचा त्यांना फायदा होईलच; त्यावर त्यांनी स्वत:च्या शब्दांत विचार मांडणे म्हणजे एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखे आहे, असेही गाडे यांनी सांगितले. प्राचार्य आणि प्राध्यापकांनी या वेळी आपल्या सूचना मांडल्या व सहकार्याचे आश्वासनही दिले.
संग्रहित लेख, दिनांक 24th Dec 2015 रोजी प्रकाशित
‘अंगभूत विचारक्षमतेच्या जोपासनेसाठी ‘ब्लॉग बेंचर्स’ !
विद्यार्थी मुळात हुशार असतातच, प्राचार्य आणि प्राध्यापकांचे त्यांना प्रोत्साहन मिळाल्यास ते लेखनात पुढे जातील, अशा शब्दांत डॉ. गाडे यांनी या वेळी ‘ब्लॉग बेंचर्स’चे कौतुक केले.
Written by दिवाकर भावे

First published on: 24-12-2015 at 03:35 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blog benchers activity by loksatta