राज्यात आरोग्य विभाग आणि म्हाडा पेपर फुटी प्रकरण ताजे असतानाच पुण्यातील एस.एम.जोशी महाविद्यालयात रविवारी (१२ डिसेंबर) झालेल्या SRPF परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचं समोर आलंय. या परीक्षेत आरोपी भावाच्या नावावर परीक्षेला बसला. इतकंच नाही तर त्याने कॉपी करण्यासाठी चक्क ब्लू टूथचा वापर केला. पर्यवेक्षकांना या प्रकाराची शंका आल्यानंतर आरोपीची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. विशाल गबरुसिंग बहूरे (रा. औरंगाबाद) असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हडपसर पोलिसांना आरोपीला अटक केले आहे, अशी माहिती हडपसरचे वरिष्ठ निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “रविवारी एस.एम. जोशी महाविद्यालयात एसआरपीएफची परीक्षा होती. या परीक्षेला भरतसिंग बहूरे नावाचा परीक्षार्थी होता. मात्र, प्रत्यक्षात परीक्षेला त्याचा भाऊ बनावट कागदपत्रे तयार करून त्याच्या जागेवर परीक्षेला आला. विशाल गबरुसिंग बहूरे असं या आरोपी भावाचं नाव आहे.

“ब्ल्यू टूथवर कुजबूज सुरू असल्यानं गैरप्रकार उघड”

परीक्षा सुरू झाली, पण परीक्षा हॉलमध्ये पर्यवेक्षकांना काही कुजबूज सुरू असल्याचे लक्षात आले. त्यावेळी पर्यवेक्षकांनी आरोपी विशालकडे चौकशी केली. मात्र, आरोपीने उडवाउडवीची उत्तर दिली. त्याची कसून तपासणी केल्यावर संबंधित आरोपी मुख्य परीक्षार्थी नसून तो भावाच्या परीक्षेला बसल्याचं निष्पन्न झालं. याशिवाय त्याच्याकडे ब्लू टूथ आणि इतर साहित्य मिळून आले. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा : CBSE 12th Exam 2021-22: गणिताचा पेपर बघून विद्यार्थ्यांना फुटला घाम; शिक्षक म्हणाले…

आरोपीचा भाऊ मुख्य परीक्षार्थी भरतसिंग बहूरे हा देखील या वेळेत परीक्षा हॉल परिसरात होता. मात्र, भाऊ पकडल्याचं लक्षात येताच तो तेथून पळून गेला. त्या आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. आता विशाल गबरुसिंग बहूरे याची पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bluetooth use in srpf exam dummy student arrest in hadapsar pune pbs
First published on: 13-12-2021 at 17:47 IST