पुणे : राज्यात शालेय स्तरावर राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०ची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. त्यानुसार नवीन अभ्यासक्रम पहिल्यांदाच लागू होणाऱ्या विद्यार्थ्यांना सेतू अभ्यासक्रम करावा लागणार आहे. तसेच, राष्ट्रीय संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) तयार केलेली पाठ्यपुस्तके राज्यासाठी आवश्यक ते बदल करून स्वीकारली जाणार आहेत.
शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०नुसार शालेय शिक्षणाची पायाभूत, पूर्वमाध्यमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अशी ५-३-३-४ अशी रचना प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यात पूर्वप्राथमिक ते दुसरी हा पायाभूत स्तर (३ ते ८ वयोगट), तिसरी ते पाचवी हा पूर्वमाध्यमिक स्तर (८ ते ११ वयोगट), सहावी ते आठवी हा माध्यमिक स्तर (११ ते १४ वयोगट), तर नववी ते बारावी हा उच्च माध्यमिक स्तर (वयोगट १४ ते १८) असणार आहे.
नव्या धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. त्यानुसार, २०२५-२६मध्ये इयत्ता पहिली, २०२६-२७मध्ये दुसरी, तिसरी, चौथी, सहावी, २०२७-२८मध्ये पाचवी, सातवी, नववी, अकरावी, तर २०२८-२९मध्ये आठवी, दहावी, बारावी या इयत्तांना नवा अभ्यासक्रम लागू होणार आहे. नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सन २०२८-२९ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असले, तरी या कालावधीपूर्वी अंमलबजावणी पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) तयार करण्यात आलेला राज्य अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) २०२४ , राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) २०२४ – यातील तरतुदी योग्य त्या बदलांसह टप्प्याटप्प्याने लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०, तसेच राज्य अभ्यासक्रम आराखड्यांच्या आधारे राज्याच्या गरजा लक्षात घेऊन राज्यासाठीचा अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम तयार करण्यात येत आहे. तसेच, नवीन अभ्यासक्रम पहिल्यांदाच लागू होणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘एससीईआरटी’ने सेतू अभ्यासक्रम तयार करून तो आवश्यक त्या सर्व वर्षांमध्ये वापरण्यात येणार आहे.
राज्यस्तरीय समितीची मंजुरी आवश्यक
पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी पाठ्यपुस्तक निर्मितीमध्ये ‘एससीईआरटी’चे संबंधित विभागप्रमुख, विषयतज्ज्ञ यांचा समावेश असावा, पाठ्यपुस्तके निश्चित केलेल्या अध्ययन निष्पत्तींची पूर्तता करणारी, अंमलबजावणीसाठी योग्य असल्याची पडताळणी ‘एससीईआरटी’ने करावी, अंतिम केलेल्या पाठ्यपुस्तकांना शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समन्वय समितीची मान्यता घ्यावी, मान्यतेनंतरच पाठ्यपुस्तकांची अंमलबजावणी करता येईल, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.