कार्बाईन व जिवंत काडतुसांसह गुरुवारी रात्री पोलिसांच्या सापळ्यात सापडलेला लोणावळ्यातील कुख्यात गुंड किसन परदेशी याने लोणावळ्याचे विद्यमान नगराध्यक्ष अमित गवळी व स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवी यांना मारण्याचा कट रचला होता, अशी धक्कादायक माहिती तपासात पुढे आली आहे. किसन परदेशी व त्याच्या सहा साथीदारांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मागील महिन्यात किरकोळ वादाच्या कारणावरुन किसन परदेशी याने त्याचेच साथीदार राजेश िपपळे व अक्षय गायकवाड यांचा अपहरण करून खून केला होता. त्याचप्रमाणे चार दिवसांपूर्वी कामशेत येथे एकावर गोळीबार केला होता. या सर्व प्रकरणी परदेशी पोलिसांना हवा होता. मात्र तो भोंदूबाबाचे रुप घेऊन व वेश बदलून फिरत असल्याने सापडत नव्हता. अखेर गुरुवारी रात्री तो पोलिसांच्या नाकाबंदीत सापडला.
पोलिसांनी किसन परदेशीकडे सखोल चौकशी केली असता त्याने लोणावळ्यातून अपहरण केलेल्या युवकांचा खून करुन त्यांचे मृतदेह ताम्हिणी घाटात फेकून दिल्याची कबुली दिली. त्याचप्रमाणे कार्बाईन गनच्या साहाय्याने नगराध्यक्ष अमित गवळी व स्वाभिमानी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे यांचा खून करण्याचा कट होता असेही त्याने चौकशीत सांगितले. मात्र या खुनांचा कट का रचला होता या मागचे कारण त्याने स्पष्ट केले नाही.      परदेशी याच्यावर आतापर्यत बावीसपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. त्याने १२ वर्षे तुरुंगातही काढली आहेत. काही काळ तो मनसेचा लोणावळा शहराध्यक्षही होता.