पुणे : शहर परिसरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. विधी महाविद्यालय रस्त्यावर असलेल्या एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी चार लाख ७६ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे विधी महाविद्यालय रस्त्यावरील शांतीशीला सोसायटीत राहायला आहेत. २९ जुलै रोजी मध्यरात्री चोरटे सोसायटीत शिरले. चोरट्यांनी बंद सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील चांदीच्या वस्तू, कॅमेरा, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण साठविणारे ‘डीव्हीआर’ यंत्र लांबविले. बुधवारी (३० जुलै) सायंकाळी ज्येष्ठ नागरिक घरी परतले. तेव्हा सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आले. त्यानंतर या घटनेची माहिती पाेलिसांना कळविण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक चांदणी शेंडे तपास करत आहेत.

विश्रांतवाडीत एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी मोबाइल संच, मनगटी घड्याळे असा २९ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. याबाबत एका महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली अहे. तक्रारदार महिला टिंगरेगनर भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. त्या १२ जुलै रोजी नागपूरला गेल्या होत्या. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. कपाटातील दोन मोबाइल संच, मनगटी घड्याळे असा ऐवज लांबवून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक लाखे तपास करत आहेत .

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा उच्छाद

शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरट्यांनी नवी पेठेतील लोकमान्यनगर परिसरात ज्येष्ठ महिला रहात असलेल्या सदनिकेचे कुलूप तोडून साडेसात लाख रुपयांचा ऐवज लांबविला होता. विश्रांतवाडी, वारजे माळवाडी भागात सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी १९ लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना नुकतीच घडली. ज्या सोसायटीत रखवालदार नाहीत अशा सदनिकांची पाहणी करुन चोरटे ऐवज लांबवितात, अशी माहिती पोलिसांनी दिली. कामनिमित्त अनेकजण सकाळी सदनिका बंद करुन बाहेर पडतात. भरदिवसा घरफोडी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ताडीवाला रस्त्यावरील रेल्वे वसाहतीत रेल्वे कर्मचाऱ्याच्या घरातून चोरट्यंनी चार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना नुकतीच घडली होती. घरफोडीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर उपनगरात गस्त वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तसेच घरफोडी करणाऱ्या सराइतांची चौकशी करण्यात येत आहे.