पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने एका व्यावसायिकाची ३७ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका व्यावसायिकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक हे पिंपरीत राहायला आहेत. आरोपी सिंहगड रस्ता भागातील नांदेड सिटीत राहायला आहेत. आरोपी आणि व्यावसायिकाची २०२२ मध्ये ओळख झाली होती. त्यावेळी आरोपींनी त्यांच्या कंपनीत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखविले होते.

तक्रारदार व्यावसायिकाने सुरुवातीला २६ लाख रुपये आरोपींना गुंतवणुकीसाठी दिले. सप्टेंबर २०२३ पर्यंत आरोपींनी परतावा दिला. त्यानंतर आरोपींनी त्यांना परतावा दिला नाही. परतावा न दिल्याने त्यांनी रक्कम परत करण्यास सांगितले. मात्र, आरोपींनी त्यांना परतावा, तसेच मुद्दलही दिली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे साेपविण्यात आला आहे.

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषााने सायबर चोरट्यांनी एकाची १४ लाख १७ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे महर्षीनगर भागात राहायला आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी तक्रारदाराच्या मोबाइल क्रमांकावर सप्टेंबर महिन्यात संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. तक्रारदाराने चोरट्यांच्या खात्यावर १४ लाख १७ हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम तपास करत आहेत.