scorecardresearch

हडपसरमध्ये व्यावसायिकाची पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या ; कौटुंबिक कलहातून आत्महत्येचा संशय

कौटुंबिक कलह तसेच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हडपसरमध्ये व्यावसायिकाची पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या ; कौटुंबिक कलहातून आत्महत्येचा संशय
(संग्रहीत)

पुणे : हडपसर भागातील एका व्यावसायिकाने देशी बनावटीच्या पिस्तुलातून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. कौटुंबिक कलहातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती तपासात मिळाली आहे.

विशाल राजेंद्र तोडकर (वय २५, रा. भागीरथीनगर हडपसर) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. विशाल तोडकर विवाहित होते. हडपसर भागात त्यांचे कपडे विक्रीचे दुकान आहे. विशाल यांनी पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली. सोमवारी सकाळी विशाल यांच्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा न उघडल्याने कुटुंबीयांनी दरवाजा वाजविला. कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा विशाल यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. विशाल यांच्या निकटवर्तीयांकडे चौकशी करण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून त्यांते पत्नीशी वाद होत होते. त्यामुळे पत्नी माहेरी निघून गेली होती. पत्नी माहेरी गेल्यानंतर ते नैराश्यात होता. कौटुंबिक कलह तसेच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली असून विशाल यांनी देशी बनावटीचे पिस्तुल कोठून आणले, यादृष्टीने तपास सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.