१४० किमी प्रतितास वेग, इकोनॉमी क्लास आणि बिझनेस क्लासचे डब्बे, मोफत वायफाय-टीव्ही अशा अनेक सुविधा आणि फायदे असलेली मेट्रो पुण्यासाठी देखील विकत घ्यावी, अशी विनंती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना केली आहे. ही नेमकी मेट्रो आहे तरी कशी आणि ती बिनपैशांची म्हणजे फुकट कशी मिळू शकेल, याचं गणितच नितीन गडकरींनी व्यासपीठावरून बोलताना आपल्या भाषणात सांगितलं आहे. तसेच, नागपूरसाठी आपण या १०० मेट्रो बुक केल्या आहेत, पुण्यासाठीही अशा १०० मेट्रो घ्याव्यात, अशी विनंती देखील त्यांनी अजित पवार यांना केली आहे.

“मी एक नवी मेट्रो शोधलीये, तिची किंमत…”

यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी पुणे आणि नागपूर मेट्रोच्या खर्चाची तुलना केली आहे. ते म्हणाले, “अजितदादा माझी तुम्हाला विनंती आहे. पुण्याच्या मेट्रोची प्रति किलोमीटर किंमत ३८० कोटी आहे. नागपूरच्या मेट्रोची किंमत ३५० कोटी प्रति किमी आहे. पण मी एक नवीन मेट्रो शोधलीये. तिची किंमत १ कोटी प्रति किमी आहे. मी या मेट्रोसाठी फुकटात पुण्यातला कन्सल्टंट बनायला तयार आहे. पुणे ते कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, बारामती, लोणावळा.. जेवढे ब्रॉडगेज आहेत, त्यावर ही ८ डब्ब्यांची मेट्रो चालू शकते. याला ४ इकोनॉमी क्लासचे एअर कंडिशन्ड इंटरनॅशनल स्टॅंडर्डचे डबे आहेत. दोन बिझनेस क्लास विमानासारखे डबे आहेत. वायफाय, टीव्ही फुकट आहेत. विमानाप्रमाणेच चहा, नाश्ता मिळेल. याचं तिकीट एसटीच्या तिकीटाप्रमाणे ठेवलं आहे. तासाला पॅसेंजर ३५ किमी जाते, एक्स्प्रेस ६० किमी जाते. पण आमच्या मेट्रोचा स्पीड १४० किमी प्रतितास आहे. म्हणजे चंद्रकांत दादा (चंद्रकांत पाटील) पावणेतीन तासांत पुण्याहून कोल्हापूरला जाता येईल. ही स्टेशनवरच थांबेल. ती स्टेशनवरूनच १०० किमीचा वेग घेते.”

नागपूरसाठी १०० मेट्रो!

नागपूरसाठी अशा १०० मेट्रो बुक केल्याचं गडकरींनी सांगितलं. “आम्ही अशा १०० मेट्रो घेणार आहोत. त्याही सरकारच्या नाही. प्रसन्ना ट्रॅव्हल, स्पाईसजेटनं घ्यायची तयारी दाखवली. पण आम्ही या मेट्रोचं कंत्राट देण्यासाठी तरुण बेरोजगार आणि कॅटरिंगचं काम करणाऱ्या नागपूर आणि विदर्भातल्या लोकांना पहिलं प्राधान्य दिलं. १०० मेट्रो बुक केल्या. ४० कोटींची मेट्रो ३० कोटींपर्यंत निगोशिएट केली आहे”, असं ते म्हणाले.

मेट्रो बिन पैशांची कशी?

दरम्यान, यावेळी बोलताना गडकरींनी ही मेट्रो बिनपैशांची म्हणजे फुकटात कशी होऊ शकेल, याचं गणितच मांडलं आहे. “मी सुभाष देसाईंना विचारणार आहे की यात ३५०० कोटीच्या मेट्रो आम्ही घेतल्या, तर मेगा प्रोजेक्ट म्हणून त्यात टॅक्स कन्सेशन द्या. ते देतात, कारण महाराष्ट्राची तशी पॉलिसी आहे. यासाठी ड्रायव्हर रेल्वेचा राहणार आहे. बाकी स्थानकं, इतर व्यवस्था यांचा खर्च नागपूर मेट्रो करणार आहे. त्यासाठी रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. त्याची वीज देखील आम्हीच विकत घेणार आहोत. ५ लाख रुपये रोजचा टर्नओव्हर आहे. महिन्याला एक कोटीची कमाई. याला दोन मालगाडीचे डब्बे आहेत. तरुण उद्योजकांना आम्ही ही देणार आहोत. पुण्यात जर तुम्ही १०० मेट्रो घेतल्या, तर फायदा होईल. पुण्यातून बाहेर प्रवासी नेणाऱ्या सगळ्या ट्रॅव्हलवाल्यांना बोलवून त्या विकत द्या. यात तुम्हाला पैसा टाकावाच लागणार नाही. तेच पैसे टाकतील. ही बिनपैशाची मेट्रो पुण्यात सुरू झाली, तर पुण्याच्या विकासात मोलाची कामगिरी होईल. यासाठी सगळी मदत करायला मी तयार आहे”, असं गडकरी म्हणाले.