पुणे : एका तरुण शेतकऱ्याला पित्ताशयाच्या कर्करोगाचे निदान झाले. याचबरोबर त्याला तीव्र कावीळ झाल्यामुळे बिलिरुबीनची पातळी वाढली होती. यामुळे केमोथेरपी उपचार घेण्यास अडथळा येत होता. डॉक्टरांनी या रुग्णावर एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड हिपॅटिकोगॅस्ट्रोक्टोमी प्रक्रिया करत पुढील कर्करोग उपचारासाठी मार्ग मोकळा केला.
या रुग्णाने अन्य ठिकाणी तपासण्या केल्या होत्या. त्यावेळेस काविळीची लक्षणे दिसून आली होती. त्याचबरोबर ताप, खाज, वजन कमी होणे, भूक मंदावणे ही लक्षणेही होती. रुग्णाच्या लिव्हर फंक्शन टेस्ट (एलएफटी) चाचणीमध्ये बिलिरुबीनची पातळी वाढल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सोनोग्राफीमध्ये पित्ताशयात मांसपेशी वाढल्याचे निदर्शनास झाले. त्यामुळे पेट सीटी चाचणी करण्यात आली. त्यात पित्ताशयाचा कर्करोगाचे निदान झाले. तसेच कर्करोग यकृत व लसिका ग्रंथींमध्ये पसरल्याचे आढळले. कर्करोगाची गाठ पित्तनलिकेवर दाब देत असल्याने काविळीचा धोका बळावला. कर्करोग पसरल्याने स्थिती ही शस्त्रक्रियेने आटोक्यात आणणे शक्य नव्हते, त्यामुळे रुग्णाला पुण्यातील केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
याबाबत पोटविकार तज्ज्ञ डॉ. अक्षय काळे म्हणाले की, रुग्णाला काविळीबरोबरच खाज सुटणे, गडद रंगाची लघवी आणि चरबीयुक्त मल अशी लक्षणे होती. यावर उपचार करणे गरजेचे होते, कारण कर्करोगाचे उपचार घेण्यासाठी हा आजार दूर करणे महत्त्वाचे होते. प्रारंभी आम्ही पित्ताचा प्रवाह पूर्ववत करण्यासाठी पित्तनलिकेतील अडथळे दूर करण्याचा विचार केला. पित्ताशयात गाठ असल्याने लहान आतड्याच्या पहिल्या भागावर दाब येत होता आणि पित्तनलिकेपर्यंत पोहोचणे अवघड होते. त्यामुळे या गुंतागुंतीच्या स्थितीत खुली शस्त्रक्रिया किंवा पोट आणि अन्ननलिकेमध्ये संपर्क प्रस्थापित करण्यासाठी केली जाणारी हिपॅटिकोगॅस्ट्रोक्टोमी ही अद्ययावत एंडोस्कोपी प्रक्रिया असे दोनच पर्याय उरले होते. हिपॅटिकोगॅस्ट्रोक्टोमी ही प्रक्रिया आम्ही करायचे ठरवले. या प्रक्रियेनंतर रुग्णाची काविळीतून मुक्तता झाली.
या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकामध्ये डॉ. अक्षय काळे यांच्यासह विभागप्रमुख डॉ. सुहास वागळे, भूलतज्ज्ञ डॉ. जॉयशंकर जाना व डॉ. खंडू पडवळ, तसेच तंत्रज्ञ स्वप्निल पाटील आणि योगेश जाधव यांचा समावेश होता.
हिपॅटिकोगॅस्ट्रोक्टोमीची पद्धत
हिपॅटिकोगॅस्ट्रोक्टोमीमध्ये एका छोट्याशा सुईने जठराच्या भिंतीमधून पित्तनलिकेत एक छोटीशी सुई टाकण्यात आली. त्यानंतर अंशत: झाकलेला एक जिओबार स्टेंट टाकण्यात आला. त्यामुळे पित्त बाहेर पडण्यासाठी एक मार्ग निर्माण झाला. यातून रुग्णाची काविळीतून मुक्तता झाली. प्रक्रिया झाल्यानंतर त्यादिवशीच संध्याकाळी रुग्णाला द्रवपदार्थ खायला देण्यास सुरुवात करण्यात आली. रुग्णाने ३ ते ४ दिवसांत सामान्य अन्न खाण्यास सुरुवात केली. आठवडाभरात रुग्णाला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
