scorecardresearch

महर्षीनगरमधील ‘म्हाडा’ची मोकळी जागा बळकाविण्याचा प्रयत्न; सहा जणांवर गुन्हा

आरोपींनी महर्षीनगरमधील ५४ गुंठे जागेवर अतिक्रमण करुन बळकावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

swargate police station
स्वारगेट पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल (प्रातिनिधिक फोटो)

बनावट दस्तऐवजाद्वारे महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाचा (म्हाडा) मालकीहक्क असलेल्या जागेवर अतिक्रमण करून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी महर्षीनगरमधील ५४ गुंठे जागेवर अतिक्रमण करुन बळकावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साखराभाई दिनश इराणी (रा. महर्षीनगर), मोना दिनश इराणी (रा. गुलटेकडी), फारेख माणेख घडीयाली (रा. लष्कर), वैशाली संतोष कांबळे (रा. गुलटेकडी), अली अकबर जाफरी (रा. स्वारगेट), ललित खेमचंद ओसवाल (रा. भवानी पेठ) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत म्हाडाचे कार्यकारी अभियंता दिनेश श्रीधर श्रेष्ठ (४१) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महर्षीनगरमधील सर्व्हे क्रमांक ६९७ मधील ११ एकर ३६ गुंठे जागा रशीद खुदाराम इराणी यांच्या मालकीची होती. म्हाडाने नियमानुसार रशीद यांच्याकडून सदर जागेचा ताबा घेतला होता. त्यानंतर नोव्हेंबर १९७० मध्ये रशीद यांचा मृत्यू झाला.

रशीद यांच्या मृत्यूनंतर त्यांचे वारसदार असलेले दारा इराणी, दिनश इराणी, पार्डून इराणी, खोदाराम इराणी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दावा दाखल केला होता. या दाव्याचा निकाल देताना जून १९८३ मध्ये या वारसांना म्हाडाने भरपाई द्यावी, असा आदेश तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी म्हाडाला दिला होता. त्यानुसार म्हाडाने कायदेशीररित्या वारसांना भरपाई रक्कम दिली होती.

भरपाई दिल्यानंतर म्हाडाने जागेवर टप्प्याटप्याने विकासाची प्रक्रिया सुरू करून इमारती बांधल्या आहेत. काही जागा मोकळी आहे. १ मे २०२२ रोजी म्हाडाच्या मोकळ्या जागेत ललित ओसवाल यांनी बेकायदा रस्ता खोदला तसेच जागेच्या परिसरात तारेचे कुंपण घातल्याची माहिती म्हाडा प्रशासनाला मिळाली होती. त्यानंतर म्हाडा प्रशासनाने पाहणी केली.

रशीद इराणी यांचे वारसदार सखाराभाई, मोना यांच्यासह फारेख घडीयाली, वैशाली कांबळे, अली जाफरी यांनी संगनमत करून जागेचे बनावट दस्तऐवज तयार करून मालकी घेतल्याचे समजले. बनावट दस्तऐवजांचा वापर करून जागेवर ताबा मिळविण्यासाठी दिवाणी न्यायालयात बनावट दस्त सादर करून न्यायालय व राज्य शासनाची फसवणूक केल्याचे म्हाडाचे कार्यकारी अभियंता श्रेष्ठ फिर्यादीत म्हटले आहे. स्वारगेट पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Case registered against 6 related to maharshi nagar mhada plot pune print news scsg