पुणे : आयपीएलच्या अंतिम सामन्यात बंगळुरू संघाच्या विजयानंतर चाहत्यांनी जल्लोष करून नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौकात (गुडलक चौक) फटाके फोडून गोंधळ घातला. सार्वजनिक रस्त्यावर मध्यरात्री फटाके फोडणाऱ्या आणि हुल्लडबाजी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या ३० ते ४० जणांविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवारी (३ जून) रात्री साडेअकरा ते साडेबाराच्या दरम्यान हा प्रकार घडला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तींनी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडून मोठ्या आवाजात जल्लोष केला. या कृतीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून, पुणे पोलिसांनी लागू केलेल्या मनाई आदेशांचाही भंग झाला आहे. त्यानुसार गुन्हा दाखल केला असून, ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरणाची पाहणी केली जाईल. त्यामध्ये हुल्लडबाजी करणारे निष्पन्न करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर यांनी दिली.