पुणे :पुणे जिल्हातील दौंड तालुक्यातील अंबिका सांस्कृतिक कला केंद्रामध्ये तीन दिवसापूर्वी गोळीबार झाल्याची घटना घडली होती.या गोळीबार प्रकरणी भोर तालुक्याचे अजित पवार गटाचे आमदार शंकर मांडेकर यांचे भाऊ बाळासाहेब मांडेकर यांच्यासह अन्य तिघां विरोधात गुन्हा दाखल झाला.या घटनेमुळे पुणे जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.
या प्रकरणी आमदार शंकर मांडेकर म्हणाले,मी सामाजिक आणि राजकीय जीवनात बर्याच वर्षापासून आहे.मी आजवर कधीच चुकीच्या कामांना थारा दिला नाही.ही बाब माझ्या तालुक्यातील सर्व नागरिकांना माहिती आहे.चौफुला येथील कला केंद्रातील घटनेबाबत मला कोणत्याही प्रकारची कल्पना नव्हती.मला काल दुपारच्या सुमारास पोलिसांचा फोन आल्यावर समजले की,चौफुला येथील एका कला केंद्रावर गोळीबार झाला.
या प्रकरणामध्ये तुमच्या भावासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.हे ऐकून माझ्यासह सर्वजण शॉक झालेत,माझ्या भावा बाबत सांगायचे झाल्यास,तो माझा लहान भाऊ असून तो समाज कार्य आणि शेती करतो.तो वारकरी समाजात देखील फिरत असतो.तो त्यादिवशी मित्रासोबत केव्हा कधी गेला. याबाबत आम्हाला कोणालाही माहिती नाही.माझा भाऊ कला केंद्रावर गेला हे शॉकींग असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
तसेच ते पुढे म्हणाले,मला पोलिसांनी घटनेबाबत सांगितल्यावर मी पोलिसांना स्पष्टपणे सांगितले की,या प्रकरणी जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई करा,त्यानंतर मी भावाला पोलिस स्टेशनमध्ये हजर होण्यास सांगितले.तसेच घडलेली घटना निंदनीय असून मी या घटनेच कधीच समर्थन करणार नाही.तसेच माझ्यावर विरोधक आरोप करीत आहेत की, पोलिसांवर दबाव आणला आणि गुन्हा दाखल करण्यास वेळ लावला, या आरोपामध्ये तथ्य नसून मीच भावाला पोलिस स्टेशन मध्ये हजर होण्यास सांगितले.ही बाब विरोधकांनी लक्षात ठेवावी,अशी भूमिका देखील त्यांनी मांडली.
तसेच ते पुढे म्हणाले,त्या ठिकाणी गोळीबार झाल्याचे बोलले जात आहे.पण माझ्या भावाकडे बंदूक नव्हती आणि त्याच्याकडे बंदुकीचा परवाना देखील नाही. ज्याच्याकडे बंदूक होती.तो मान्य करेल आणि ती बाब तपासात समोर येईल,असे त्यांनी सांगितले.