पुणे: पीएमपीने तिकिटांसाठी कॅशलेस सुविधा सुरू केल्यानंतर आता पासधारकांसाठीही ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवारपासून (२३ ऑक्टोबर) पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पासकेंद्रांवर ही सुविधा सुरू होणार आहे. सर्व ४० पासकेंद्रांवर क्यू-आर कोडद्वारे रक्कम भरून पास घेता येणार आहे.

महापालिकेचे आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार आणि पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रताप सिंह यांच्या उपस्थितीत ही सेवा सुरू होणार असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.

हेही वाचा… फ्रान्समधील ‘झिंगी’ सफरचंद पहिल्यांदाच भारतात दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीएमपीने प्रवाशांसाठी कॅशलेस सुविधा सुरू केली आहे. त्याला प्रवाशांचा प्रतिसादही मिळत आहे. गेल्या २१ दिवसांत पीएमपीला १९ लाख ४९ हजार ४०० रुपयांचे उत्पन्न यामाध्यमातून प्राप्त झाले असून, ७३ हजार ७२८ तिकिटांची विक्री झाली आहे. तर ८९ हजार ३६८ प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. पीएमपीकडून सर्व पास केंद्रांवर विविध प्रकारच्या पासची विक्री केली जाते. महामंडळास महिन्यातून सरासरी पास विक्रीतून ५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. तर सरासरी ६० हजार पासची विक्री होते. यामध्ये दैनंदिन, त्रैमासिक, मासिक आणि वार्षिक पासचा समावेश आहे. पासची मोठी विक्री होत असल्याने आणि उत्पन्न मिळत असल्याने पास केंद्रांवरही कॅशलेस सुविधा देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सर्व ४० पास केंद्रांवर क्यू-आरकोडद्वारे रक्कम देऊन पास घेता येणार आहे.