लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : पिंपरी – चिंचवडमध्ये गुरूवारी (३१ ऑक्टोबर) एकाच दिवशी दहा ठिकाणी फटाक्यांमुळे आगीच्या घटना घडल्या. त्यामध्ये कासारवाडी येथील सरिता संगम गृहनिर्माण सोसायटीतील तिसर्‍या मजल्यावरील सदनिकेला मोठी आग लागली. यात घरगुती साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

वाकड येथील पार्कस्ट्रीट सोसायटी, कस्पटेवस्ती, नंददिप सोसायटी, चिंचवड येथील एम्पायर इस्टेट, वडमुखवाडी येथील जेनीनी सोसायटी, पिंपळेसौदागर येथील निसर्ग मान सोसायटी, फुगेवाडी – कुंदननगर येथील सँडविक कंपनीसमोर, दिघी-आळंदी रोडवरील नानाश्री मंगल कार्यालय आणि सांगवी येथील कृष्णा चौकात गुरूवारी एकाच दिवशी या आगीच्या घटना घडल्या आहेत. सायंकाळी पाच ते रात्री बारा या वेळेत आगीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. कासारवाडी येथील सरिता संगम सोसायटीतील तिसर्‍या मजल्यावरील सदनिकेच्या बाल्कनीत बाहेरून फटाका पडल्याने आग लागली.

आणखी वाचा-‘सुरक्षेची भाऊबीज ओवाळणी’ ऐवजी अंगणवाडी सेविकांना कारवाईची नोटीस

बाल्कनीतील साहित्याने पेट घेतल्याने काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. अग्निशमन दलाला माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरवाजाचे कुलूप तोडून जवानांनी आत प्रवेश केला. बाल्कनीतील आग आटोक्यात आणली. तेथे गॅस सिलेंडर आढळून आला. तो त्वरीत सुरक्षितस्थळी नेण्यात आला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. घरातील बाल्कनीतील कपाट तसेच गृहपयोगी साहित्याचे नुकसान झाले. सुदैवाने आगीच्या एकाही घटनांमध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

आणखी वाचा-फटाक्यांच्या विषारी धुरामुळे श्वास कोंडला!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात फटाके वाजविले जातात. शहराच्या मध्यवर्ती भागात पिंपरी, चिंचवड, भोसरी, वाकड, सांगवी, निगडी, आकुर्डी, पिंपळेनिलख, पिंपळेगुरव, पिंपळेसौदागर या भागात मोठ्या प्रमाणात आतिषबाजी होते. त्यामुळे शहरात ध्वनी व वायू प्रदूषणात भर पडते. प्रदूषण रोखण्यासाठी रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत फटाके फोडण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही नागरिक रात्री उशिरापर्यंत फटाके वाजवित असल्याचे दिसून येत आहे. मोठ्या आवाजाचे किंवा घातक रसायन असणारे फटाके वापरू नयेत. यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. कमी आवाजाचे आणि पर्यावरणाला बाधा पोहोचणार नाही, असे फटाके वापरण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.