घोटाळ्याचे लोण राज्यभर पसरल्याची शक्यता
पुणे : शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरप्रकारानंतर आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळांची ना हरकत प्रमाणपत्रे बनावट असल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील अनेक शाळांची ना हरकत प्रमाणपत्रे बनावट असल्याचे उघड झाले असून, लाखो रुपये घेऊन बनावट कागदपत्रे देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. शाळांच्या बनावट ना हरकत प्रमाणपत्रांचे लोण राज्यभरात असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात राज्य मंडळाव्यतिरिक्त अन्य मंडळांची संलग्नता मिळवण्यासाठी संस्थाचालकांना राज्य शासनाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. मात्र पुण्यातील काही शाळांना असे प्रमाणपत्र दिलेले नसतानाही काही शाळा सुरू झाल्याचा प्रकार शालेय शिक्षण विभागाच्या निदर्शनास आला. त्या अनुषंगाने संबंधित तीन शाळांच्या चौकशी करण्याचे, अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याचा आदेश शालेय शिक्षण विभागाने राज्यातील विभागीय शिक्षण उपसंचालकांना दिला होता. त्यानुसार पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी पुणे जिल्हा परिषदेला चौकशी करण्याचे निर्देश दिले.
हेही वाचा >>> आभासी चलन गुंतवणुकीच्या आमिषाने १९ लाखांचा गंडा, टोळीचा सूत्रधार गजाआड
या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी के. डी. भुजबळ यांनी चौकशी केल्यावर अनेक शाळांची ना हरकत प्रमाणपत्रे बनावट असल्याचे निदर्शनास आले. बनावट ना हरकत प्रमाणपत्रांसाठी मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या नावांचा आणि बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर करण्यात आला आहे. तसेच या बनावट ना हरकत प्रमाणपत्रांसाठी लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचेही व्हॉट्सॲप चॅटच्या माध्यमातून उघडकीस आले आहे. तसेच मुंबईतील काही शाळांची ना हरकत प्रमाणपत्रेही बनावट असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाच्या चौकशीचा सविस्तर अहवाल सादर करण्यात येणार आहे. तसेच या प्रकरणाचे लोण राज्यभरात असण्याची शक्यता आहे.
पुण्यातील तीन शाळांची चौकशी करण्याबाबत मंत्रालयाकडून कळवण्यात आले होते. त्यानुसार चौकशी केल्यावर दोन शाळांनी प्रस्ताव न पाठवता मान्यतेचे प्रमाणपत्र मिळाल्याचे शाळांचे म्हणणे आहे. या अनुषंगाने जिल्हा परिषदेने आणखी दहा शाळांची चौकशी केली आहे. त्या चौकशीचा अहवाल सोमवारी दाखल केला जाईल. त्यातून अधिक तपशील उघड होईल.