पुणे : ‘‘मिशन मौसम’ या योजनेअंतर्गत ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन क्लाऊड फिजिक्स’ची उभारणी ‘आयआयटीएम’मध्ये करण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून कृत्रिम पाऊस पाडणे, गारपीट नियंत्रणे, धुके, वायुप्रदूषण कमी करणे अशा विषयांवर अभ्यास करण्यात येणार आहे. तसेच ‘क्लाऊड चेंबर’ विकसित करून मूलभूत संशोधनाला चालना दिली जाणार आहे,’ अशी माहिती केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांनी दिली.
भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेत (आयआयटीएम) आयोजित ११ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन जागतिक हवामानशास्त्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. अब्दुल्ला अल् मान्दौस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी रविचंद्रन बोलत होते. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा, डॉ. एस्टेल दे कॉनिंग, डॉ. स्टिव्हन्स सिम्स, डॉ. साराह टेसेन्ड्रॉफ, आयआयटीएमचे संचालक डॉ. सूर्यचंद्र राव, डॉ. तारा प्रभाकरन या वेळी उपस्थित होते.
डॉ. रविचंद्रन म्हणाले, ‘देशात ‘मिशन मौसम’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. या अंतर्गत हवामान अंदाज सुधारणे, हवामान परिवर्तन तंत्रज्ञानाचा विकास करणे, भारताला हवामानासाठी सज्ज असलेले क्लायमेट स्मार्ट राष्ट्र म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन क्लाऊड फिजिक्स’ची उभारणी ‘आयआयटीएम’मध्ये करण्यात येणार आहे. सध्या हवामान मानवाला नियंत्रित करत आहे, मात्र, हवामान समजून घेऊन त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी सक्षम होण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य आवश्यक आहे.’
‘हवामान बदल, पाण्याची टंचाई, तीव्र हवामानासारख्या वाढत्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर हवामानाशी संबंधित प्रत्येक कृती वैज्ञानिक पुराव्यांवर, नैतिक तत्त्वांवर आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यावर आधारित असली पाहिजे. त्याद्वारे वैज्ञानिक क्षमता वाढवण्यासाठी, सर्वोत्तम पद्धतींचे आदानप्रदान करणे शक्य होऊन जलव्यवस्थापन, हवामानासंबंधित नव्या तंत्रज्ञानाचा शोध घेणे शक्य होईल. गेल्या सात दशकांहून अधिक काळ जागतिक हवामानशास्त्र संस्था हवामानाचे आकलन, निरीक्षणे, अंदाज वर्तवण्याचे कार्य करीत आहे. त्यात आता हवामान परिवर्तन संशोधन हा महत्त्वपूर्ण संशोधनाचा विषय ठरला आहे. त्यात ढगांचे भौतिकशास्त्र, पर्जन्यवृद्धी आणि गारपिटींचे प्रमाण कमी करणे यांचा समावेश आहे. या परिषदेच्या माध्यमातून विज्ञानाधिष्ठित निर्णयप्रक्रियेचा प्रसार करणे, देशांच्या सीमांच्या पलीकडे जाऊन सहकार्य वाढवणे, आपले कार्य उपजीविका, पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या जागतिक उद्दिष्टाला समर्पित ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवणे महत्त्वाचे आहे,’ असे मत जागतिक हवामानशास्त्र संस्थेचे (डब्ल्यूएमओ) अध्यक्ष डॉ. अब्दुल्ला अल् मान्दौस यांनी मांडले.
संशोधनासाठी ‘यूएई’कडून १५ लाख डॉलर्सचे अनुदान
संयुक्त अरब आमिरातीचा (यूएई) पर्जन्यवृद्धी विज्ञान प्रकल्प यंदा दशकपूर्ती साजरी करीत आहे. यात ७६ देश आणि ३,७०० हून अधिक संबंधित संस्था सहभागी झाल्या. १४ संशोधकांना २.५ कोटी अमेरिकी डॉलर्सचे अनुदान देण्यात आले. या प्रकल्पात १,८०० संशोधकांनी सहभागी होऊन १०५ वैज्ञानिक प्रकाशने आणि १० एकस्व अधिकार निर्माण केले. येत्या तीन वर्षांत १५ लाख डॉलर्सपर्यंतचे अनुदान देण्याचे नियोजन आहे. त्यासाठी शास्त्रज्ञांनी या प्रकल्पात सहभागी होण्याचे आवाहनही डॉ. अब्दुल्ला यांनी केले.
