पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने पुणे विभागात सरलेल्या आर्थिक वर्षात ५ कोटी ५७ लाख प्रवाशांनी प्रवास केला. आधीच्या वर्षाच्या तुलनेत प्रवासी संख्येत १८ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या वर्षभरात विभागात तिकीट तपासणी मोहिमेअंतर्गत फुकट्या प्रवाशांकडून २७ कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल केला आहे.

गेल्या आर्थिक वर्षात २०२३-२४ मध्ये पुणे विभागात ५ कोटी ५७ लाख प्रवाशांनी प्रवास केला. आधीच्या वर्षीपेक्षा त्यात १८.४ टक्के वाढ नोंदविण्यात आली. गेल्या आर्थिक वर्षातील प्रवासी संख्या उद्दिष्टापेक्षा ५.२ टक्के अधिक आहे. पुणे विभागाला तिकीट तपासणीद्वारे एकूण २७ कोटी ८४ लाख रुपयांचा महसूल मिळाला. त्याआधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत त्यात १२.९ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.

हेही वाचा – ‘बीई’ करूनही मिळत नाहीये नोकरी!

पुणे विभागाला २०२३-२४ मध्ये एकूण १ हजार ७९७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. तो आधीच्या वर्षाच्या तुलनेत १५.८ टक्के जास्त आहे. त्यात प्रवासी वाहतुकीतून १ हजार २१० कोटी रुपये मिळाले असून, आधीच्या वर्षाच्या तुलनेत त्यात १८.१ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. मालवाहतुकीतून ४४७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला असून, तो आधीच्या वर्षापेक्षा ११ टक्के जास्त आहे. गेल्या आर्थिक वर्षात पुणे विभागाला पार्सलमधून २९ कोटी ५६ लाख रुपये मिळाले असून, इतर प्रकारच्या महसुलातून २० कोटी ४२ लाख रुपये मिळाले आहेत.

हेही वाचा – राज्यावर उष्माघाताचे संकट! जाणून घ्या सर्वाधिक धोका कुठे वाढला…

विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेशकुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी करण्यात आली.

हेही वाचा – अजितदादांच्या चिरंजीवाने निवडणूक लढविलेल्या मावळातून ‘घड्याळ’ हद्दपार !

मार्चमध्ये २ कोटी १४ लाखांचा दंड

पुणे विभागात मार्चमध्ये तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान २६ हजार ३७४ प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून २ कोटी १४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच ८ हजार ५४६ प्रवाशांवर अनियमित प्रवासासाठी कारवाई करण्यात आली. त्यांना ५१ लाख ६७ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच सामानाची नोंदणी न करता घेऊन जाणाऱ्या २३३ प्रवाशांकडून ३४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.