पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात येणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची (सीटीईटी) घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार ८ फेब्रुवारी रोजी ही परीक्षा देशभरातील १३२ शहरांमध्ये आयोजित केली जाणार आहे.
सीबीएसईने प्रसिद्धिपत्रकाद्वारे परीक्षेची माहिती दिली. राज्यस्तरावरील राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आयोजित केली जाते, तर राष्ट्रीय पातळीवर सीबीएसईतर्फे सीटीईटी ही परीक्षा घेण्यात येते. सीबीएसईतर्फे वर्षातून दोन वेळा परीक्षेचे आयोजन केले जाते. उमेदवारांना शिक्षक होण्यासाठीची पात्रता प्राप्त करण्यासाठी टीईटी किंवा सीटीईटी यातील कोणतीही परीक्षा उत्तीर्ण होता येते.
सीबीएसईने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, ८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सीटीईटीमध्ये पेपर १ आणि पेपर २ चा समावेश असणार आहे. एकूण २० भाषांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेबाबतची सविस्तर माहिती, अभ्यासक्रम, पात्रता, परीक्षा शुल्क, परीक्षा केंद्रे असलेली शहरे याबाबतचा तपशील स्वतंत्रपणे जाहीर केला जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी https://ctet.nic.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने पहिली ते आठवीच्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्याचा निर्णय दिला आहे. त्यात पाच वर्षांपेक्षा कमी सेवाकाळ असलेल्या शिक्षकांना सूट देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य परीक्षा परिषदेतर्फे २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेच्या नोंदणीत वाढ होऊन ४ लाख ७९ हजार उमेदवारांनी अर्ज भरला आहे.
