पुणे: कोथरूड भागात दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. वेगवेगळ्या घटनांत दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलांच्या गळ्यातील दोन लाख ६५ हजारांचे दागिने हिसकावून नेले. पौड फाटा चौकातील दशभुजा गणपती मंदिर, तसेच पौड रस्त्यावरील लोहिया जैन आयटी पार्क परिसरात या घटना घडल्या.

पौड फाटा चौकातील दशभुजा गणपती मंदिरासमोर रविवारी (११ मे) सकाळी साडेसहाच्या सुमारास पादचारी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील दोन लाख ४० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला रविवारी सकाळी दशभुजा गणपती मंदिर परिसरातून निघाल्या होत्या. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले.

सहायक पोलीस निरीक्षक निंबाळकर तपास करत आहेत. दुसऱ्या एका घटनेत पौड रस्त्यावरील लोहिया जैन आयटी पार्क परिसरात पादचारी महिलेच्या गळ्यातील २५ हजार रुपयांचे मंगळसूत्र रविवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले. याबाबत एका महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक बालाजी सानप तपास करत आहेत.

पाषाणमध्ये सोनसाखळी हिसकावलीपाषाण-पंचवटी परिसरात रविवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास पादचारी ज्येष्ठ नागरिकाकडे पत्ता विचारण्याचा बहाणा करून दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ८० हजारांची सोनसाखळी हिसकावून नेली. याबाबत एका ७० वर्षीय तक्रारदाराने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे फिरायला निघाले होते. त्या वेळी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेली. सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील तपास करत आहेत. पाषाण आणि कोथरूड परिसरात दागिने हिसकावणारे चोरटे एकच असावेत, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे.