लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पुढील दोन दिवस दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. रविवारनंतर कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम कमी होऊन राज्यभरात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कमी दाबाचे क्षेत्र पूर्व-मध्य अरबी समुद्रावर आहे. कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होत आहे. आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात आर्द्रतेत वाढ झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून पुढील दोन दिवस दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड व गोव्यात मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, बीड, नगर, धाराशिव आणि लातूर येथे हलक्या पावसाची शक्यता आहे. रविवारनंतर पावसाची शक्यता नाही, ढगाळ हवामान कमी होऊन राज्यभरात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. पुढील काही दिवस दक्षिण महाराष्ट्रात धुके पडण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा-‘मराठा आरक्षणासाठी वेळ देण्याची आवश्यकता’; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य

गुरुवारी राज्यात फारसा पाऊस झाला नाही. पावसाचा जोर कमी झाला आहे. गुरुवारी सांताक्रुझ येथे सर्वाधिक ३५.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची आणि जळगावात १४.७ अंश सेल्सिअस नीचांकी किमान तापमानाची नोंद झाली आहे.