पुणे : गणेशाच्या आगमनाच्या दिवशी बुधवारी (३१ ऑगस्ट) आणि १ सप्टेंबरलाही राज्याच्या काही भागांत हलक्या सरींची शक्यता आहे. प्रामुख्याने दक्षिण कोकण, पश्चिम-उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. काही भागांत विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाची उघडीप आहे. त्यामुळे दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा ३० ते ३४ अंशांच्या दरम्यान गेला आहे. त्यामुळे काही भागांत दुपारी उन्हाची तीव्रता जाणवते. सध्या पूर्वोत्तर राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. त्याचप्रमाणे दक्षिणेकडे वाऱ्यांची चक्रीय स्थिती असल्याने या भागांतही पाऊस जोर धरतो आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्यातही बहुतांश भागांत हलक्या सरींची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मंगळवारी नाशिकमध्ये जोरदार सरी कोसळल्या. महाबळेश्वर, सातारा, सोलापूर, परभणी आदी भागांत तुरळक पाऊस झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आदी जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. काही भागांत विजांच्या कडकडाटात सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे, पुणे, नाशिक, नगर, जळगाव, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांतही हलक्या पावसाचा अंदाज आहे. विदर्भातही जवळपास सर्वच भागांत तुरळक ते हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.