मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. यानंतर मनसे भाजपाच्या युतीबाबत चर्चांना उधाण आलंय. याबाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता त्यांनी यावर थेट भूमिका स्पष्ट केली. तसेच अशा प्रस्तावावर विचार करण्यासाठी आमची राज्याची १३ जणांची कोअर कमिटी असल्याचं म्हटलं. मात्र, आम्ही निर्णय घेऊ शकत नाही, केवळ केंद्राला प्रस्ताव पाठवू शकतो, असंही चंद्रकांत पाटलांनी नमूद केलं. ते गुरुवारी (१४ एप्रिल) पुणे स्टेशन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी आले असताना माध्यमांशी बोलत होते.

चंद्रकांत म्हणाले, “असा कुठलाही प्रस्ताव नाही. प्रस्ताव आल्यानंतर त्यावर विचार करण्यासाठी आमची राज्याची १३ जणांची कोअर कमिटी आहे. ते देखील निर्णय करू शकत नाहीत. ते जास्तीत जास्त केंद्राकडे प्रस्ताव पाठवतील. त्यामुळे तसा कोणताही निर्णय आत्ता नाही.”

“राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि भाजपाविरोधातही मतं मांडलेली”

“राज ठाकरे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. ते कुणाची बी टीम म्हणून काम करत नाहीत. कुणाच्या सांगण्यावरून ते बोलत नाहीत. त्यांना जी मत मांडायची ती ते परखडपणे मांडतात. त्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजप विरोधात देखील मतं मांडलेली आहेत. महविकास आघाडी आणि शरद पवार यांचं असं आहे की त्यांना बरं म्हटलं की बरं, कोर्टाने त्यांना न्याय दिला की न्याय, कोर्टाने किरीट सोमय्या यांना न्याय दिला की काहीतरी गडबड, हे बरोबर नाही,” असंही मत चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “चंद्रकांत पाटलांनी मला पाहिलं आणि…”; वसंत मोरेंनी सांगितली जुनी आठवण, भाजपाच्या ऑफरबद्दल म्हणाले…

संजय राऊत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केली. याबाबत विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, “स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी सातत्याने सुरू आहे. त्यामुळे सरकारमध्ये असताना भाजपाचा त्याला पाठिंबा आहे. भारतरत्नची प्रक्रिया पूर्ण करून स्वातंत्र्यवीर सावरकरांना, महात्मा जोतिबा फुले यांना, अण्णाभाऊ साठे या सर्वांना भारतरत्न मिळालं पाहिजे, अशी आमची आग्रही भूमिका आहे.”