पुणे : भारतीय जनता पक्षाचे पद म्हणजे जबाबदारी आणि अपेक्षा आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदारी आणि अपेक्षांची योग्य तो समन्वय साधावा, अशी सूचना राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केली. अयोध्या येथील श्रीराम मंदिर सोहळा आनंदोत्सव आहे. त्यामुळे २२ जानेवारी रोजीची जय्यत तयारी करावी, असेही त्यांनी सांगितले.
भाजपच्या कोथरूड मंडल कार्यकारिणीतील नवनियुक्त पदाधिकऱ्यांना पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यावेळी पाटील बोलत होते. भाजप प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, उपाध्यक्ष माधव भंडारी, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा >>>रेल्वेने प्रवास करताय? ब्लॉकमुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या मार्गात बदल
भाजप ही केवळ राजकीय संघटना नाही तर, सामाजिक संघटना म्हणून काम करत आहे. त्यामुळे पक्षाचे पद केवळ पद नसून ती जबाबदारी आणि अपेक्षा आहे. ती सांभाळताना कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले पाहिजे. संघटना वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा, अशी पक्षाची अपेक्षा आहे. त्यामुळे जबाबदारी आणि अपेक्षा यांचा योग्य समन्वय साधणे आवश्यक आहे. पक्ष संघटन वाढीसाठी आणि बूथ सक्षमीकरणासाठी सुपर वारियर्स ही संकल्पना राबविण्यात आली आहे. कार्यकर्त्यांनी बूथ सक्षमीकरणावर भर दिला पाहिजे, असे पाटील यांनी सांगितले.
अयोध्येतील राम मंदिर उभारणीचे काम पूर्ण होऊन २२ जानेवारी रोजी प्रतिष्ठापना होणार आहे. या आनंदोत्सवसाठी सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे. त्यासाठी सर्वांनी जय्यत तयारी करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.