scorecardresearch

पुणे: गणेश अथर्वशीर्ष अभ्यासक्रमात बदल करण्याची विद्यापीठाची भूमिका

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील गणेश अथर्वशीर्ष अभ्यासक्रमावर टीका करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यापीठाने अभ्यासक्रमात बदल करण्याची भूमिका घेतली आहे.

पुणे: गणेश अथर्वशीर्ष अभ्यासक्रमात बदल करण्याची विद्यापीठाची भूमिका
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ( संग्रहित छायचित्र )

अभ्यासक्रमाबाबत सूचना करण्याचे आवाहन

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील गणेश अथर्वशीर्ष अभ्यासक्रमावर टीका करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यापीठाने अभ्यासक्रमात बदल करण्याची भूमिका घेतली आहे. अभ्यासकांनी या अभ्यासक्रमाविषयी सूचना केल्यास  विद्यापीठ अधिकार मंडळाद्वारे विचार करून सुयोग्य बदल करण्यात येतील, असे विद्यापीठाने स्पष्ट केले. 

  विद्यापीठाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे या बाबत माहिती दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संस्कृत व प्राकृत विभाग, लोकमान्य टिळक महाविद्यालय, संस्कृत विभाग आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट पुणे यांचे संयुक्त विद्यमाने ‘ श्री गणेश अथर्वशीर्ष’ हा एक श्रेयांकाचा अभ्यासक्रम विनामूल्य ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करण्यात आला आहे. सदर अभ्यासक्रम हा कोणत्याही पदवी किंवा पदव्युत्तर पदवीचा आवश्यक भाग नसून, हा अतिरिक्त श्रेयांकाचा सक्तीचा नसलेला निःशुल्क ऑनलाईन अभ्यासक्रम आहे. सदर अभ्यासक्रमाला विद्यापीठाच्या अधिकार मंडळांनी मान्यता दिलेली असून, तसे पत्र दिनांक १९ सप्टेंबर २०२२ रोजी जारी केले आहे.

हेही वाचा >>> पुणे: करोनानंतर नोंदणी विवाहांना पसंती; वर्षभरात सहा हजार नोंदणी विवाह

या अभ्यासक्रमाचा उद्देश भारतीय संस्कृतीमधील संस्कृत स्त्रोत्रांचा अर्थ समजावून सांगणे, त्यामागील शास्त्रोक्त अर्थ आणि व्याकरण पोहोचवणे असा आहे, असे विद्यापीठाने नमूद केले. नवीन शैक्षणिक धोरणानुसार भारतीय भाषा, भारतीय संस्कृती, भारतीय मूल्ये यांतील विविध स्त्रोत्र आणि वाङ्मय अभ्यासकांना उपलब्ध करून दिला आहे. विविध माध्यमांमध्ये या अभ्यासक्रमाविषयी अभ्यासकांनी अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. अभ्यासकांनी या अभ्यासक्रमाविषयी सूचना केल्यास  विद्यापीठ अधिकार मंडळाद्वारे विचार करून सुयोग्य बदल करण्यात येतील, असे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले. 

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 15:01 IST

संबंधित बातम्या