पुणे : ‘सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचे बदलते चित्र बघता राजकीय टीकाकारांना भरपूर ‘स्कोप’ असल्याचे लक्षात येते. मोठमोठी आंदोलने होत आहेत. राजकारणातही कशाचा नेम राहिला नाही,’ अशी टिपण्णी ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी गुरूवारी केली. ‘व्यंगचित्रकारांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. सध्याचे राजकारण-समाजकारण यांचा वेध व्यंगचित्रकारांनी मोकळेपणाने घ्यायला हवा. आजूबाजूला घडणाऱ्या सगळ्या घटकांचा वापर करत व्यक्त व्हायला हवे,’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
‘कार्टूनिस्ट कम्बाईन’च्या वतीने पुणे फेस्टिवलच्या अंतर्गत ‘कार्टुनोत्सव’ या व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन फडणीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. महोत्सवाचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, ॲड. अभय छाजेड, डॉ. सतीश देसाई, व्यंगचित्रकार संजय मिस्त्री, चारुहास पंडित, योगेंद्र भगत, विश्वास सूर्यवंशी, शरयू फरकंडे, विवेक प्रभूकेळुसकर या वेळी उपस्थित होते.
फडणीस म्हणाले,‘सध्या महाराष्ट्राचे राजकारणात कशाचाही नेम राहिलेला नाही. आजूबाजूचे चित्र फार वेगाने बदलते आहे. मोठमोठी आंदोलने केली जात आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाचे हे चित्र पाहिले की, राजकीय टीका करण्यासाठी मोठा स्कोप असल्याचे सहज दिसते. व्यंगचित्रकारांच्या माध्यमातून राजकिय टीका-टिपण्णी करणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. त्याचा वापर करून त्यांनी व्यंगचित्रे साकारायला हवीत.’
‘पूर्वी व्यक्त होण्यासाठी साधनांची कमतरता होती. व्यंगचित्र प्रदर्शन भरवण्याचेही आव्हान होते. आता मात्र काळ वेगाने बदलत आहे. व्यंगचित्रकारांसाठी व्यासपीठ उपलब्ध होत आहे. प्रदर्शने आयोजित केली जात आहेत. आधीच्या व्यंगचित्रकार-चित्रकारांनी घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे,’ अशी भावना फडणीस यांनी व्यक्त केली.
‘पुणे फेस्टिवल’मध्ये पहिल्यांदाच व्यंगचित्रांचे प्रदर्शन आयोजित केल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. आगामी काळात सर्वच ललित कलांचा समावेश महोत्सवात करण्यात यावा, अशी अपेक्षाही ‘शिदं’नी व्यक्त केली.
‘गणपती हा कलेचा देवता आहे. लोकमान्य टिळकांनी मोठ्या दूरदृष्टीने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची कल्पना मांडली. एकतेचा संदेश देणाऱ्या गणेशमूर्तीचे वैविध्य त्यांनी जाणले होते. समाजात एकोपा निर्माण होण्यासाठी अशा प्रकारच्या कला महोत्सवांची गरज असते,’ असे मत मिस्त्री यांनी व्यक्त केले.
‘पुणे हे विद्येबरोबरच कलेचेही माहेरघर आहे. या शहराने नेहमीच कलाकारांची दखल घेतली. त्यांना प्रेम दिले,’ अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. चारूहास पंडीत यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. अभय छाजेड यांनी आभार मानले.