पुणे : महापालिकेकडे मिळकतकराचे बिल भरण्यासाठी नागरिकांनी जमा केलेले सुमारे १ हजार ५३० धनादेश वटलेच नाहीत. कोट्यवधी रुपयांचे धनादेश न वटल्याने महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने संबंधित मिळकतदारांना नोटीस देखील पाठविल्या आहेत. त्यानंतर ८८२ मिळकतदारांनी दंडासह मिळकतकर भरला आहे. मात्र, अद्यापही ६४० जणांनी हा कर भरलेला नाही.
महापालिकेचा मिळकतकर रोख, ऑनलाईन, धनादेशाद्वारे आणि बँकेमार्फत आरटीजीएसच्या स्वरुपात भरता येतो. गेल्या काही वर्षांमध्ये ऑनलाईनबरोबरच धनादेशाद्वारे मिळकत कर भरण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. अनेक नागरिक मोठ्या रकमेच्या मिळकतकराचे बिल धनादेशाद्वारे भरतात. मात्र, यापैकी काही धनादेश संबंधित मिळकतदाराच्या बँक खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नसल्याने वटत नाहीत. धनादेश न वटल्यास त्याचा दंड महापालिकेकडे भरावा लागतो.
चालू आर्थिक वर्षात (२०२५ – २६ ) देखील नागरिकांनी मिळकत कराच्या बिलापोटी महापालिकेकडे जमा केलेले १ हजार ५३० धनादेश बँकेत वटले नाहीत. या धनादेशांची एकूण रक्कम २९ कोटी ३० लाख रुपये इतकी आहे. या सर्व मिळकत धारकांना महापालिकेकडून नोटीस बजावली तसेच त्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठविण्यात आले. त्यानंतर ८८२ मिळकत धारकांनी दंडासह १५ कोटी २८ लाख रुपये मिळकत कर भरला आहे. मात्र, अद्याप ६४८ मिळकत धारकांनी नोटीस व मेसेज मिळाल्यानंतरही महापालिकेचा मिळकत कर भरलेला नाही.
या मिळकतदारांकडून महापालिकेला १४ कोटी २ लाख रुपये मिळकत कर व त्यावरील दंड येणे बाकी आहे. या नागरिकांना त्यांनी दिलेला धनादेश वटला नसल्याची माहिती कळविण्यात आली आहे. धनादेश बाऊन्स झालेल्या मिळकतधारकांनी तातडीने थकीत मिळकतकराची रक्कम आणि त्यावरील दंड भरावा, असे आवाहन उपायुक्त अविनाश सपकाळ यांनी केले.
मिळकत कर आकारणी आणि कर संकलन विभागाचे उपायुक्त अविनाश सपकाळ म्हणाले, या मिळकतदारांचे धनादेश बँकेत वटले नाहीत आणि ते परत आले आहेत. अशा मिळकतधारकांना महापालिकेने नोटीस देऊन त्यांच्या मोबाईल क्रमांकावर देखील याची माहिती दिलेली आहे. त्यांच्याकडून मिळकत कराची मूळ रक्कम, धनादेश न वटल्याने दंड तसेच त्यांनी मुदतीत मिळकत कर न भरल्यास त्यावर लावण्यात येणारे व्याज देखील आकारले जाणार आहे.
चालू आर्थिक वर्षामध्ये महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये मिळकत कर विभागाला ३२५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी पहिल्या अडीच महिन्यामध्ये मिळकत कर विभागाने १५०० कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा टप्पा पार केला आहे. उर्वरित उत्पन्नाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न सुरू करण्यात आले असून ते पूर्ण होईल, असा विश्वास अविनाश सपकाळ यांनी व्यक्त केला.