लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची इंदापूरमध्ये पंचायत समितीच्या मैदानावर ‘ओबीसी एल्गार’ सभा होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांची याच ठिकाणी २१ ऑक्टोबरला सभा झाली होती. तेच ठिकाण भुजबळांच्या सभेसाठी निवडण्यात आले असून, त्याद्वारे भुजबळ हे बळ दाखविणार आहेत. जरांगे पाटील यांच्यापेक्षा जास्त गर्दी करून ओबीसींचा बुलंद आवाज दाखविण्यात भुजबळ यशस्वी होणार का, याबाबत उत्सुकता असणार आहे.
इंदापूर हा ओबीसीबहुल परिसर आहे. या ठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या सभेचे नियोजन करण्यासाठी ओबीसीचे नेते गेल्या अनेक दिवसांपासून तयारी करत आहेत. जरांगे पाटील यांची या ठिकाणी सभा झाली होती. तेच ठिकाण सभेसाठी निवडण्यात आले आहे. विराट सभा घेऊन ओबीसीची ताकद दाखिण्याचा प्रयत्न या सभेद्वारे होणार आहे. त्यामुळे या सभेला किती गर्दी होणार, याबाबत औत्सुक्य असणार आहे. या सभेला माजी आमदार प्रकाश शेंडगे, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, आमदार गोपीचंद पडळकर, ॲड. बबन तायवाडे, प्रा. लक्ष्मण गायकवाड आदी ओबीसी नेत्यांची उपस्थिती असणार आहे.
आणखी वाचा-पिंपरी: महापालिका आयुक्त सल्लागारावर मेहरबान; दुसऱ्यांदा मुदतवाढ, तीन कोटी उधळणार
हेच ठिकाण का निवडले?
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या स्थानिक पॅनेलला धक्का देण्यासाठी स्थानिक पातळीवरील ओबीसी नेते एकत्र आले होते. दौंड तालुक्यातील केडगावात पूनम बारवकर या सरपंचपदी निवडून आल्या आहेत. त्यामागे स्थानिक ओबीसी नेत्यांनी मोठी भूमिका निभावल्याची चर्चा आहे. त्यातून ओबीसी नेत्यांची एकजूट दिसून आली. या पार्श्वभूमीवर ‘ओबीसी एल्गार’ सभा घेण्याची मागणी करण्यात येत होती. तसेच जरांगे पाटील यांचीही सभा याच मैदानावर झाली होती. या सभेचे ठिकाण निवडण्यामागे ही कारणे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.