महानगर पालिका निवडणुकीच्या वेळी पुण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची सभा नियोजित करण्यात आली होती. परंतु सभेला कुणीच नाही असे दिसल्यावर त्यांना ती सभा रद्द करावी लागली होती. पुण्यात सभा असली की अजूनही भीती वाटते असे म्हणत त्यांनी ‘त्या’ सभेची आठवण काढली. आज मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्यांनी महानगर पालिका निवडणुकी वेळी रद्द करण्यात आलेल्या सभेची आठवण काढली. त्यांनी या सभेचा उल्लेख करताच श्रोत्यांनीही त्यांना हशा आणि टाळ्यांनी दाद दिली.
फेब्रुवारीमध्ये न्यू इंग्लिश स्कूल मैदानावर नियोजित करण्यात आलेल्या सभेत कुणीही आले नव्हते. ही सभा रद्द होऊन देखील भाजपने पुणे आणि पिंपरी चिंचवड निवडणुका जिंकल्या आणि इतिहास रचला. परंतु या सभेच्या आठवणींनी मुख्यमंत्र्यांचा पिच्छा काही सोडला नाही. आज जेव्हा मुख्यमंत्री आपल्या खुर्चीवरुन भाषणासाठी उठून उभे राहिले तेव्हा त्यांनी सर्व सभागृहावर एकवार नजर टाकली. हॉलमधील सर्व खुर्च्या भरलेल्या पाहिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले आणि त्यांनी या सभेची आठवण केली.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने सभेचे नियोजनही केले होते. या सभेला मोठी गर्दी होईल, असा अंदाज होता. पण मुख्यमंत्र्यांची सभा असूनही सभेतील खुर्च्या रिकाम्याच होत्या. मुख्यमंत्री सभेच्या ठिकाणी २.१५ वाजता आले होते. पण मैदानातील कार्यकर्त्यांची संख्या आणि रिकाम्या खुर्च्या बघून ते लगेच माघारी फिरले. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभा रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. नियोजनाअभावी सभा रद्द करत असल्याचे त्यांनी ट्विटद्वारे स्पष्ट केले आणि पिंपरीत होणाऱ्या प्रचारसभेसाठी ते निघून गेले होते. पिंपरीत झालेल्या सभेला मात्र प्रचंड गर्दी होती.