पुणे : मुंबईतील बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीचे राजकीयकरण करायला नको होते. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजकीयकरण केले. मात्र, मतदारांनी ‘ठाकरे ब्रँड’ नाकारला.’ अशी टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘विजयी पॅनेलचे प्रमुख शशांक राव आणि प्रसाद लाड हे दोघेही आमचेच आहेत’ असे स्पष्ट केले.
बेस्ट पतपेढीमध्ये शशांक राव यांच्या पॅनेलला १४ आणि प्रसाद लाड यांच्या पॅनेलला ७ जागा मिळाल्या. शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या पॅनेलला एकही जागा मिळाली नाही. या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘ही पतपेढीची निवडणूक होती. या निवडणुकीचे राजकीयकरण करायला नको होते. मात्र, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी राजकीयकरण केले. मतदारांनी ‘ठाकरे ब्रँड’ नाकारला. निवडून आलेल्या पॅनेलचे राव आणि लाड हे दोघेही आमचेच आहेत.’
‘राज्यात पावसामुळे नुकसान झालेल्यांना लवकरच मदत दिली जाणार आहे. त्यासाठी पंचमाने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.’ असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. रोहित पवार यांच्याकडून करण्यात येणाऱ्या आरोपांबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘रोहित पवार हे वेगवेगळे आरोप करत असतात. मात्र, त्यांनी पुरावे दिले पाहिजेत.’
राव, लाड ‘स्टार’ प्रचारक
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत मुंबईकर कोणाच्या पाठिशी आहेत हे शशांक राव आणि प्रसाद लाड यांनी दाखवून दिले आहे. पक्षाची स्टार प्रचारकांची यादी जाहीर होईल. त्यामध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी हे दोघे स्टार प्रचारक असतील, असे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.
‘ठाकरे बंधूंना एकही जागा मिळाली नाही. यावरून मुंबई कोणाच्या मागे आहे, हे दिसून आले आहे. भाजप पक्ष म्हणून या निवडणुकीत उतरलो नव्हती. ही निवडणूक कामगारांची होती. प्रत्येक गोष्टीत राजकारण केले की काय होते. याचे फळ या निवडणुकीत ठाकरे बंधूंना मिळाले. त्यांच्या हाती भोपळा आला. ‘शोले’मध्ये जय-विरुची जोडी होती. तशीच जोडी बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत शशांक राव आणि प्रसाद लाड यांची आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीत दोघे ‘स्टार’ प्रचारक असतील.’ असे शेलार यांनी स्पष्ट केले.