पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अप्रत्यक्षपणे आभार मानले. या कार्यालयाचे भूमीपूजन हे अजित पवारांनी केले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने या इमारतीचे काम पूर्ण केले असून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. ही इमारत अतिशय सुंदर असून, या वास्तूचे ज्यांनी भूमीपूजन केले होते, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो, असे वक्तव्य फडणवीसांनी केले. तसेच यापुढील काळात ज्या नवीन इमारतीचे किंवा प्रकल्पाचे उद्घाटन होईल, त्या ठिकाणच्या भूमिपूजनाचे फलक काढू नयेत, अशा सूचनाही यावेळी दिल्या. जूनी इमारत म्हणजे शासकीय कार्यालयच असणार असा समज सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झालेला आहे. मात्र या इमारतीमुळे हा गैरसमज दूर होईल. सार्वजनिक बांधकाम विभागाने चांगली इमारत बांधली आहे, असे ते म्हणाले.

काही दिवसांपूर्वी एका उपजिल्हाधिकाऱ्याला लाच घेताना पकडण्यात आले होते. या घटनेचा दाखला देत प्रशासनातील अधिकाऱ्यांना त्यांनी खडेबोल सुनावले. आगामी काळात भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाचा संकल्प करा, असा प्रसंग पुन्हा उद्भवणार नाही, याची दक्षता घ्या, असे ते म्हणाले. पुणे जिल्ह्यातील प्रशासकीय कामात झिरो पेंडन्सी चांगल्या प्रकारे राबवण्यात आली असून येत्या काळात राज्यात झिरो पेडन्सी राबवण्यासाठी अध्यादेश काढण्याची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केली.

यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी आणि जिल्हाधिकारी सौरभ राव आदी अधिकारी उपस्थित होते.