शिवसेना नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर शिवसेना भवनावर शिंदे गटाकडून दावा केला जाणार असल्याची चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना भवनावर दावा करणार नसल्याचे सोमवारी स्पष्ट केले. शिवसेनेच्या कोणत्याही मालमत्तेवर आणि संपत्तीवर दावा केला जाणार नाही. मालमत्ता आणि संपत्तीचा मोह नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध समाज घटाकांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

शिवसेना नाव आणि चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. हा निर्णय मेरीटवर झाला आहे. त्यामुळे त्यावर आक्षेप घेणे चूक आहे. न्यायव्यवस्थेचे काही अधिकार असतात. लोकशाहीत ही संस्था स्वायत्त आहेत. आयोगाच्या निर्णयाचे जनतेने स्वागत केले आहे. मात्र निर्णय बाजूने लागला की चांगला आणि विपरीत लागला की अयोग्य असे म्हणणे चुकीचे आहे. नाव आणि चिन्ह मिळाल्याने विधिमंडळाचे कार्यालय ताब्यात घेतले. मात्र कोणत्याही मालमत्तेवर किंवा संपत्तीवर दावा करायचा नाही. त्याचा मोह नाही, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा >>> पुणे : पक्षाचा प्रचार करण्यात गैर काय? पंकजा मुंडे यांचा सवाल

भाजप-शिवसेनेने युती म्हणून निवडणूक लढविली. मात्र सत्तेसाठी, खुर्चीसाठी विचारांना तिलांजली देण्यात आली. कोणी काही आरोप करत असले तरी त्यावर बोलायचे नाही. खुर्चीसाठी विचारांना तिलांजली दिल्यानेच त्यांच्यावर ही वेळ आली आहे, अशी टीकाही त्यांनी शिवसेनेवर केली.

दरम्यान, ब्राह्मण समाज नाराज नाही. विरोधकांकडून मुद्दामहून ही अफवा पसरवली जात आहे. कोणाला निवडून द्यायचे आणि कोणाला नाही, हे मतदार ठरविवात. त्यामुळे अजित पवार काही विधाने करत असली तरी त्यात तथ्य नाही. सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहेत. त्यामुळे जनता भाजप-शिवसेना युतीबरोबर आहे. कसब्यात युतीचा उमेदवार विजयी होईल, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> पुणे : महाविकास आघाडी- शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोश्यारींना विमानातून कोणी उतरविले महाविकास आघाडीचे सरकार असताना दबावात काम करावे लागत होते, असा आरोप माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला आहे. महाविकास आघाडीमधील मंत्री म्हणून कोश्यारी यांच्यावर दबाव होता का, अशी विचारणा शिंदे यांच्याकडे केली असता त्यांनी त्यावर जास्त भाष्य करणे टाळले. कोश्यारी यांनी चांगले काम केले. त्यांना विमानातून कोणी उतरविले हे सर्वांना माहिती आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या तक्रारीबाबत चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. त्यांना सुरक्षा व्यवस्था पुरविली जाईल असे सांगताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्र दिले आहे. नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करावा, असे सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची भूमिकेला सरकारचा पाठिंबा आहे, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.